‘गणपती चालले गावाला, चैन पडेना आम्हाला’ असे म्हणत सोमवारी धुमधडाक्यात गणपतीचे विसर्जन करण्यात आले. एकीकडे सर्वजण आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देऊन घरी परतत होते, त्याचवेळी तरुणाई मात्र संपूर्ण समुद्रकिनारी पसरलेल्या कचऱ्याकडे पाहून अस्वस्थ होताना दिसत होती. त्यामुळे आता विसर्जनानंतर समुद्राच्या साफसफाईसाठी आणि लोकांच्या मनात या विषयी जागृती निर्माण करण्यासाठी तरुणाई सरसावली आहे. हातात झाडू घेत समुद्रकिनारे आणि लोकांची मने साफ करण्यासाठी त्यांनी मोहिम हाती घेतली आहे.
दहा दिवस पाहुणा म्हणून आलेल्या गणपतीचे आदरातिथ्य करण्यात कोणीच कसलीही कसर बाकी ठेवली नाही, पण त्याच्या विसर्जनानंतर त्या गोंडस, गोजिऱ्या मूर्तीची अवस्था मात्र भावनेला धक्का देणारी आहे. दहा दिवसांच्या गणपतींचे विसर्जन झाल्यावर, मुंबईच्या समुद्रकिनाऱ्यांवर एक फेरफटका मारल्यास त्यांची अवस्था पाहून मन विषण्ण होते. हात, सोंड तुटलेल्या गणपतीच्या मूर्ती, फुलं, हार, निर्माल्य यांचा चौफेर पसरलेला कचरा, थर्माकोलच्या मखरांचा पसारा यामुळे किनाऱ्यांची अवस्था दयानीय होऊन जाते. हे चित्र पाहून अस्वस्थ झालेल्या तरुणाईने आता हातात झाडू घेऊन समुद्रकिनाऱ्यांच्या साफसफाईची मोहीम सुरू केली आहे. गेल्या काही वर्षांपासून महाविद्यालयांतील एनसीसी आणि स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून तरुण मंडळींना हाताशी घेत स्वच्छता मोहिमा राबवण्यात येत आहेत. अशाच एका मोहिमेमध्ये भाग घेणाऱ्या मानस बर्वे याने सांगितले, ‘गेली दोन वर्ष आम्ही महाविद्यालयातर्फे सफाईसाठी जात आहोत. त्यावेळी तुटलेल्या गणपतीच्या मूर्ती, निर्माल्याचा कचरा गोळा करुन त्याची योग्य विल्हेवाट करण्याचा प्रयत्न आम्ही करतो. ज्या गणपतीची आपण दहा दिवस मनोभावे सेवा करतो, त्याच मूर्तीला दहा दिवसांनी तुटलेल्या अवस्थेमध्ये किनाऱ्यावर टाकून द्यायचे हे पाहून आपण नक्की हा सण का साजरा करतो, असे विचारावेसे वाटते.’ ही मुले समुद्रकिनाऱ्याच्या सफाईसाठी झटत असतात, पण तरीही लोकांपासून मिळणारा प्रतिसाद थंड असतो, असे शांभवी कटाव सांगते. ‘आम्ही महाविद्यालयातर्फे गौरी-गणपतीच्या विसर्जनाच्या दिवशी साफसफाईला जात असू, तेव्हा आम्हाला मदत करायचे सोडा पण आम्ही सफाई करतोय म्हणून लोक आमच्यासमोर अजून कचरा करायचे.’
स्मार्टफोनमुळे तरुणाई बिघडली असे अनेकांचे म्हणणे असते, पण याच स्मार्टफोनचा उपयोग या विषयावर जागृती पसरवण्यासाठी तरुणाई करत आहे. अपूर्वा शेरे सांगते, ‘विसर्जनानंतर मुंबईच्या किनाऱ्यांची होणारी अवस्था पाहून यावर्षी मी मला शक्य तितकी जनजागृती करण्याचा प्रयत्न केला. मागच्या वर्षीच्या विसर्जनानंतरची छायाचित्रे गोळा करुन व्हॉट्स अ‍ॅपच्या माध्यमातून ते आणि संदेश पाठविले. त्याला सगळ्यांनी भरभरुन प्रतिसाद दिला होता.’
असेच काही मेसेज फेसबुकच्या माध्यमातूनसुद्धा फिरत होते. प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तीचे लगेच विघटन होत नाही. त्यामुळे त्या तशाच जीर्ण अवस्थेमध्ये किनाऱ्यावर पडून राहतात. त्यामुळे त्याच्या जागी शाडूच्या किंवा कायमस्वरुपी मूर्ती वापरण्याचा संदेश गणेशोत्सोवादरम्यान फेसबुकवर फिरत होते. थर्माकोलच्या मखरांचे विघटन कसे करावे किंवा त्यांचाच पुर्नवापर करावा, याबद्दलसुद्धा व्हिडीयोज यूटय़ुबवर फिरत होते. प्रत्यक्ष साफसफाईच्या मोहिमांमध्ये भाग घेता येत नाही ते सोशल मिडीयाच्या पातळीवर जागृतीचा प्रयत्न करत आहेत.