महाराष्ट्राच्या अस्सल संस्कृतीचे, परंपरेचे प्रतिबिंब म्हणजेच गणेशोत्सवाचा मंगल सोहळा! लोकमान्य टिळकांनी सुरू केलेल्या सार्वजनिक गणेशोत्सवाच्या परंपरेइतकाच आकर्षक आणि अवर्णनीय असतो तो सार्वजनिक गणेश मंडळाचा गणेशोत्सवाचा सोहळा. शहरातील काही सार्वजानिक गणेश मंडळाने गेल्या काही वर्षांत गणेशोत्सवात देशातील विविध मंदिराच्या प्रतिकृती साकारून आकर्षक सजावटीने भव्य दिव्य स्वरूप दिले असले तरी त्यासोबत सामाजिक भान जपले आहे. शहरात महाल भागातील दक्षिणामूर्ती स्वयंसेवक गणेश मंडळात गेल्या अनेक वर्षांपासून सांस्कृतिक कार्यक्रमांसोबत सामाजिक भान जपून वैचारिक आणि समाजपयोगी कार्यक्रम सादर केले.
१९२० मध्ये गणेश शेटे यांच्या मार्गदर्शनाखाली या गणेश मंडळाची स्थापना झाली. या परिसरात दक्षिणामूर्ती मंदिर असल्यामुळे मंडळाला दक्षिणामूर्ती गणेश मंडळ नाव देण्यात आले. महामहोपाध्याय बाळशास्त्री हरदास या परिसरात राहत असल्यामुळे ते या गणेश मंडळाशी जुळले गेले आणि त्यांनी गणेश उत्सवाच्या निमित्ताने परिसंवाद, वादविवाद आणि विविध मान्यवरांची व्याख्याने सुरू केली आणि ती परंपरा आजही या मंडळात सुरू आहेत. बाळशास्त्री हरदास यांची महाराष्ट्रात उत्कृष्ट वक्ता म्हणून ख्याती होती त्यामुळे या गणेश मंडळात साहित्यिक, विचारवंतांनी हजेरी लावली आहे. गणेशोत्सव म्हणजे केवळ मनोरंजनाचे साधन नाही तर त्याला वैचारिक व्यासपीठ आहे या उद्देशाने व्याख्यानासोबत विद्यार्थ्यांसाठी वक्तृत्व स्पर्धासह आणि इतर स्पर्धाचे आयोजन करण्यात आले आहे. दररोज गणपतीची आरती केल्यानंतर भारताचे वैभव सांगणारी स्वातंत्र्यवीर सावरकरांनी रचलेली प्रार्थना मंडळाचे जुने नवीन कार्यकर्ते एका सुरात गात असतात. आरतीची वेळ ही कटाक्षाने पाळली जात असल्यामुळे त्यावेळी मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित राहत असतात. सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या एका व्यक्तीचा किंवा संस्थाचा दरवर्षी मंडळातर्फे गणेशोत्सवामध्ये सत्कार केला जातो. आतापर्यंत मंडळाने प्रज्ञा राऊत, ज्येष्ठ समाजसेविका सिंधूताई सपकाळ, वृद्धांना आसरा देणारे डॉ. रामटेके यांचा सन्मान करण्यात आला आहे. याशिवाय कीर्तन, गोपालकाला, महिलांचे भजन आदी धार्मिक कार्यक्रम मंडळात सादर होत असतात. देशासाठी ज्या स्वातंत्र्यवीरांनी बलिदान दिले आहे त्यांचे स्मरण म्हणून क्रांतीकारकांवर व्याख्याने आयोजित केली जातात.
पर्यावरणाच्यादृष्टीने मंडळाने गेल्या वर्षी वस्तीमध्ये वृक्षारोपण केले होते. शिवाय ‘वृक्ष लावा आणि जगवा’ असा संदेश देत घरोघरी वृक्षाचे वाटप करण्यात आले आहे. आजच्या डीजे संस्कृतीमध्ये गणेशोत्सवामध्ये दररोज सकाळ संध्याकाळी भजने, भक्तिगीते वाजविली जातात. गणेशयाग, महाप्रसाद आदी कार्यक्रम मंडळाने आयोजित केले आहे.
युवा कार्यकर्त्यांंची फौज असलेल्या या मंडळाने लोकमान्य टिळक आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे विचार गणेशोत्सवाच्या माध्यमातून जनतेपर्यंत पोहचविण्याचे कार्य केले आहे.