शहराचे माजी नगराध्यक्ष व शिवसेनेचे प्रथम जिल्हाप्रमुख कर्मवीर काकासाहेब सोलापूरकर यांच्या पत्नी स्वातंत्र्यसैनिक व श्रीसंत गाडगे महाराज नागरी सहकारी पतसंस्थेच्या ज्येष्ठ संचालिका रामप्यारीबाई सोलापूरकर यांचे १०१ व्या वर्षी निधन झाले. त्यांच्या इच्छेनुसार मृतदेह मराठा विद्या प्रसारक समाजाच्या डॉ. वसंतराव पवार वैद्यकीय महाविद्यालयास नेत्रदानासह देहदान करण्यात आले. शंकरराव बर्वे यांनी त्यांचा मृतदेह संस्थेच्या स्वाधीन केला.
सोलापूरकर या स्वातंत्र्यसैनिक असतानाही शासनाच्या कोणत्याही सवलतींचा लाभ त्यांनी घेतला नाही. त्यांनी लिंगायत, कोष्टी समाजास आडगाव येथे अर्धा एकर जमीन शैक्षणिक कार्यासाठी, सिडको येथील त्रिमूर्ती चौकात महादेवाचे मंदिर तसेच कर्मवीर काकासाहेब सोलापूरकर प्रतिष्ठानच्या सामाजिक कार्यासाठी राहते घर त्यांनी दान केले. १९४७ च्या स्वातंत्र्यलढय़ात तसेच गोवा मुक्ती आंदोलन, संयुक्त महाराष्ट्र आंदोलन लढय़ात सहभाग घेऊन कारावास भोगला होता. कर्मवीर काकासाहेब सोलापूरकर यांचे सामाजिक कार्य त्यांनी कर्मवीर काकासाहेब सोलापूरकर प्रतिष्ठान आणि श्री संत गाडगे महाराज नागरी सहकारी पतसंस्था  यांच्या मार्फत त्यांनी पुढे सुरू ठेवले होते.