सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडीसाठी येत्या ३० नोव्हेंबर रोजी बँकेच्या संचालक मंडळाची सभा आयोजित करण्यात आली आहे. पदाधिकाऱ्यांच्या निवडीबाबत सत्ताधारी राष्ट्रवादी गटांतर्गत राजकीय हालचालींना वेग आहे. विशेषत: माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील यांच्या भूमिकेकडे सर्वाचे लक्ष वेधले आहे.
बँकेचे अध्यक्ष संजय शिंदे (माढा) व उपाध्यक्ष चंद्रकांत गणपतराव देशमुख (सांगोला) यांची मुदत संपल्यामुळे नवीन अध्यक्ष व उपाध्यक्षांची निवड केली जाणार आहे. त्यासाठी जिल्हाधिकारी गोकुळ मवारे यांनी येत्या ३० नोव्हेंबर रोजी संचालक मंडळाची सभा बोलावली आहे. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून सोलापूर विभागाचे प्रांत डॉ. विजयसिंह देशमुख हे काम पाहणार आहेत.
संपूर्ण सोलापूर जिल्ह्य़ातील ग्रामीण राजकारणावर प्रभाव टाकणाऱ्या, तसेच ग्रामीण भागाची आर्थिक नाडी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेवर वर्षांनुवर्षे मोहिते-पाटील गटाचे वर्चस्व होते. परंतु मागील विधानसभा निवडणुकीत पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघात पक्षांतर्गत गटबाजीतून विजयसिंह मोहिते-पाटील यांच्या झालेल्या पराभवाच्या पाश्र्वभूमीवर जिल्ह्य़ातील राजकीय संदर्भ बदलले आहेत. त्यांनीच घडविलेली व आमदारपदापर्यंत मोठी झालेली मंडळी मोहिते-पाटील विरोधक म्हणून वावरू लागली. यातूनच माढय़ाचे आमदार बबनराव शिंदे यांचे बंधू संजय शिंदे हे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष झाले. जिल्हा परिषदेतही मोहिते-पाटील यांचे वर्चस्व संपुष्टात आणले गेले.
मात्र, या पाश्र्वभूमीवर अलीकडे राज्याच्या राजकारणात मोहिते-पाटील यांचे महत्त्व वाढू लागले असून मंत्रिमंडळाच्या संभाव्य फेरबदलात मोहिते-पाटील यांना मंत्रिपदावर स्थान मिळण्याची चर्चा जिल्ह्य़ातील राष्ट्रवादीअंतर्गत होत आहे. यातच मोहिते-पाटील यांनी शरद पवारांसह अजित पवार यांच्याशी चांगलेच जमवून घेतल्याचे बोलले जात असताना जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या अध्यक्ष व उपाध्यपदाची निवडणूक जिल्ह्य़ातील राष्ट्रवादीअंतर्गत राजकारणात गाजण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
दरम्यान, एकेकाळी संपूर्ण राज्यात अग्रेसर ठरलेल्या सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेची घडी आता काही प्रमाणात विस्कटली आहे. भारतीय रिझव्‍‌र्ह बँकेने या बँकेला अलीकडेच पाच लाखांचा दंड ठोठावला आहे. त्यामुळे या बँकेत आर्थिक शिस्त लागणे गरजेचे आहे, असे मानले जाते. या पाश्र्वभूमीवर होणारी अध्यक्ष निवडीची निवडणूक तेवढीच महत्त्वाची ठरली आहे.
अध्यक्षपदासाठी विद्यमान अध्यक्ष संजय शिंदे हे पुन्हा इच्छुक नसल्याचे सांगण्यात आले. तर, मोहोळचे माजी आमदार राजन पाटील-अनगरकर व दक्षिण सोलापूरचे काँग्रेसचे आमदार दिलीप माने यांची नावे अध्यक्षपदासाठी चर्चेत आहेत. राजन पाटील हे यापूर्वी सलग पाच वर्षे बँकेचे अध्यक्ष होते. सध्या ते स्वत:चे पुनर्वसन करून घेण्याच्या प्रयत्नात आहेत. मोहिते-पाटील यांच्याशी त्यांचे घनिष्ठ संबंध आहेत. या संबंधाला त्यांनी कधीही तडा जाऊ दिला नाही. त्यामुळे बँकेच्या अध्यक्षपदासाठी त्यांचे नाव आघाडीवर असल्याचे बोलले जाते. तर दक्षिण सोलापूरचे आमदार दिलीप माने हे जरी काँग्रेसचे असले तरी, बँकेच्या संचालक मंडळावर त्यांची झालेली निवड पक्षीय राजकारणविरहित मानली जाते. शिवाय त्यांचे मोहिते-पाटील व त्यांच्या विरोधकांशी संबंध कायम आहेत. मोहिते-पाटील यांच्याकडून बेरजेचे राजकारण झाल्यास आमदार माने यांना अध्यक्षपदाची संधी मिळू शकते, असे राजकीय वर्तुळात बोलले जाते. सद्य:स्थिीत बँकेत मोहिते-पाटील गटाच्या संचालकांची संख्या जास्त आहे. परंतु मोहिते-पाटील यांनी कोणतीही आक्रमक भूमिका न घेता संयम पाळणेच पसंत केल्याचे दिसून येते. यातच बारामतीकरांची भूमिका महत्त्वाची ठरणार असल्याने या घडामोडींकडे सर्वाचे लक्ष वेधले आहे.