भूमी अभिलेख विभागाच्या सोलापूर जिल्हा भूमी अभिलेख अधीक्षक कार्यालय आंतरराष्ट्रीय गुणवत्ता आयएसओ नामांकनाच्या अंतिम टप्प्यात असून, प्रथमच जनताभिमुख प्रशासनाच्या दृष्टीने आयएसओ नामांकन मिळणारे हे राज्यातील पहिलेच कार्यालय ठरणार आहे.
आयएसओ नामांकनांतर्गत गुणवत्ता नियंत्रण कार्यक्रम जिल्हाधिकारी कार्यालयातील बहुद्देशीय सभागृहात आयोजिला होता. यात जिल्हय़ातील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांना पूरक प्रशिक्षण देण्यात आले. या प्रशिक्षण कार्यशाळेचे उद्घाटन निवासी उपजिल्हाधिकारी पराग सोमण यांच्या हस्ते करण्यात आले. भूमी अभिलेख विभागाचे जिल्हा अधीक्षक बाळासाहेब वानखेडे हे अध्यक्षस्थानी होते. या वेळी आयएसओ नामांकन संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुजय खेडेकर यांनी आयएसओ नामांकनाचे महत्त्व व त्याचे सातत्य टिकण्यासाठी करावे लागणरे प्रयत्न तसेच प्रशासन जनताभिमुख होण्यासाठी अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आपल्या कार्यशैलीत कसे बदल घडवावेत, याविषयी मार्गदर्शन केले.
निवासी उपजिल्हाधिकारी पराग सोमण यांनी भूमी अभिलेख जिल्हा अधीक्षक कार्यालयाच्या आयएसओ नामांकनासाठी आखण्यात आलेल्या रूपरेषा व त्यानुसार होत असलेल्या प्रयत्नांची मुक्तकंठाने प्रशंसा केली. तर अध्यक्षीय भाषणात भूमी अभिलेख जिल्हा अधीक्षक बाळासाहेब वानखेडे यांनी भूमी अभिलेख कार्यालयात आयएसओ नामांकनाची आवश्यकता व त्याची फलनिश्चिती यावर मनोगत मांडले. या कार्यशाळेचा समारोप जिल्हा पुनर्वसन अधिकारी भारत वाघमारे यांनी केला. भूमी अभिलेख विभागाच्या मोहोळच्या उपअधीक्षक लीना ओहोळ यांनी कार्यशाळेचे सूत्रसंचालन केले, तर माढय़ाचे उपअधीक्षक सिद्धेश्वर घुले यांनी आभार मानले. या कार्यशाळेत एस. व्ही. कोकणे, ए. पी. जाधव, सी.बी. पाटील, विजय गायकवाड, आय.टी. लांडे, बी. एन. धुळप, एस. वाय. मसणे, एम. के. बुरसे आदींनी प्रामुख्याने सहभाग नोंदविला होता. ही कार्यशाळा यशस्वी करण्यासाठी सतीश गायकवाड, ए. पी. क्षीरसागर, पी. सी. कांबळे, व्ही. जी. अधटराव, विशाल जाधव, ए. जी. कुरेशी, एस. एम. डोंबाळे आदींनी परिश्रम घेतले.