ऊस दराच्या प्रश्नावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेने हाती घेतलेल्या आंदोलनाच्या पाश्र्वभूमीवर सोलापूरचे जिल्हा दंडाधिकारी डॉ. प्रवीण गेडाम यांनी येत्या ७ डिसेंबपर्यंत संपूर्ण जिल्हा ग्रामीण भाग ‘अशांत क्षेत्र’ म्हणून घोषित केले आहे.
उसाला प्रति टन ३००० चा दर मिळावा म्हणून स्वाभिमानी शेतकरी संघटनेने साखरपट्टयात तीव्र आंदोलन सुरू केले आहे. गतवर्षी याच प्रश्नावर या संघटनेने केलेल्या आंदोलनात खासगी व सार्वजनिक मालमत्तांचे मोठया प्रमाणात नुकसान होऊन त्यात ३८ गुन्हे दाखल झाले होते. यंदाच्या वर्षीही गळीत हंगामात उसाला दर मिळाल्याशिवाय एकाही साखर कारखान्याचे धुराडे पेटू देणार नाही, असा इशारा देत स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आंदोलन सुरू केले आहे. हे आंदोलन गतवर्षीपेक्षा अधिक तीव्र करण्याचा इशाराही संघटनेने दिल्यामुळे कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी तसेच जीवित व मालमत्तेचे नुकसान टाळण्यासाठी जिल्हा दंडाधिकारी डॉ. गेडाम यांनी संपूर्ण जिल्हा ग्रामीण भाग ७ डिसेंबपर्यंत ‘अशांत क्षेत्र’ म्हणून घोषित केले आहे. यापूर्वी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून साखर कारखान्यांच्या परिसरात २०० मीटर क्षेत्रात फौजदारी दंडसंहिता कलम १४४ नुसार जमावबंदीचे आदेश जारी करण्यात आले आहेत.