केंद्रीय रेल्वे अर्थसंकल्पात सोलापूर-मुंबईसाठी आणखी एक नवीन रेल्वेगाडी मंजूर झाल्याने सोलापूरकरांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. याशिवाय व्हाया सोलापूरकडे येणाऱ्या-जाणाऱ्या काही रेल्वेगाडय़ांचा सेवा विस्तार झाल्याचे समाधानही सोलापूरकरांच्या पदरात पडले.
सध्या मुंबईसाठी सोलापूरकरांना सिध्देश्वर एक्स्प्रेसवर पूर्णत: अवलंबून राहावे लागते. अतिशय सोईच्या असलेल्या या गाडीला बारा महिने प्रवाशांचा भरभरून प्रतिसाद मिळतो. त्यामुळे या गाडीतून प्रवास करण्यासाठी प्रवाशांना सहजासहजी तिकीट आरक्षण उपलब्ध होत नाही. सर्वसाधारणपणे दोनशे ते तीनशेपर्यंत आरक्षण प्रतीक्षा यादी जाते. त्यामुळे सिध्देश्वर एक्स्प्रेसला पर्याय म्हणून आणखी एक गाडी मुंबईसाठी उपलब्ध व्हावी, अशी सोलापूरकरांची गेल्या अनेक दिवसांपासूनची मागणी होती. या मागणीचा विचार करून सोलापूरचे खासदार तथा केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री पवनकुमार बन्सल यांच्याकडे शब्द टाकला होता. त्यांची राजकीय इच्छाशक्ती फळाला आली आाणि अखेर मुंबईसाठी सोलापूरहून दुसरी स्वतंत्र रेल्वेगाडी मंजूर झाली.
यासंदर्भात बोलताना मध्यरेल्वेच्या सोलापूर विभागाचे वरिष्ठ वाणिज्य व्यवस्थापक सुशील गायकवाड यांनी यंदाच्या रेल्वे अर्थसंकल्पातून सोलापूरकरांच्या पदरात काय पडले, याची माहिती दिली. लोकमान्य टिळक टर्मिनस (कुर्ला)-विशाखापट्टणम (व्हाया सोलापूर) ही साप्ताहिक रेल्वेगाडी आता दररोज धावणार आहे.त्यामुळे मुंबई व विशाखापट्टणमला जाण्या-येण्यासाठी ही गाडी अधिक सोयीची झाली आहे.
सोलापूर-यशवंतपूर (बंगळुरू) ही गाडी आता यशवंतपूरच्या पुढे म्हैसूपर्यंत धावणार आहे, तर बागलकोट-यशवंतपूर (व्हाया सोलापूर) ही गाडीसुध्दा यशवंतपूरच्या पुढे म्हैसूपर्यंत विस्तारित सेवा देणार आहे. तसेच लातूर-मुंबई-लातूर एक्स्प्रेस यापुढे नांदेडपर्यंत धावणार आहे. सोलापूर-दौंड-मनमाडमार्गे धावणारी यशवंतपूर-निझामोद्दीन एक्स्प्रेस ही आतापर्यंत आठवडय़ातून दोनवेळा धावत होती. ती आता आठवडय़ातून चारवेळा धावणार आहे. यात दोनवेळा ही गाडी निझामोद्दीनच्या ऐवजी चंदिगढपर्यंत धावणार आहे.
रेल्वे अर्थसंकल्पात यंदा पंढरपूर-विजापूर व्हाया मंगळवेढा लोहमार्गाचे नव्याने सर्वेक्षण करण्यास मंजुरी देण्यात आली आहे. त्यामुळे मंगळवेढामार्गे पंढरपूर-विजापूरची सुमारे तीनशे किलोमीटर अंतराची रेल्वेसेवा नव्याने जोडली जाण्याची आशा निर्माण झाली आहे. त्यामुळे दुष्काळी मंगळवेढय़ाचाही विकास होण्यास हातभार लागण्याची अपेक्षा आहे. याशिवाय वाडी ते गदग हा नवीन लोहमार्ग सुरू होण्यासाठीही सर्वेक्षण करण्यास मंजुरी मिळाली आहे. दौंड ते बेलापूर लोहमार्गाचे विद्युतीकरणाचे काम येत्या वर्षांत पूर्ण करण्याचा संकल्प रेल्वेच्या अंदाजपत्रकात सोडण्यात आला आहे.
तथापि,मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागाने यंदा रेल्वे अर्थसंकल्पात सोलापूर-नागपूर एक्स्प्रेस, सोलापूर-हैदराबाद एक्स्प्रेस, सोलापूर-कोल्हापूर एक्स्प्रेस, लातूर-तिरूपती एक्स्प्रेस, नांदेड-पंढरपूर-कोल्हापूर एक्स्प्रेस, सोलापूर-जयपूर व्हाया शिर्डी एक्स्प्रेस आदी नवीन गाडय़ांना मंजुरी मिळण्यासाठी प्रस्ताव पाठविला होता. तसेच मुंबई-पंढरपूर फास्ट पॅसेंजर दररोज धावण्यासाठीचा प्रस्तावही सादर करण्यात आला होता. त्यापैकी सोलापूर-नागपूर व सोलापूर-हैदराबाद या गाडय़ांना मंजुरी मिळण्याची अपेक्षा होती. मात्र त्याबाबत भ्रमनिरास झाला. सोलापूर-मुंबई या दुसऱ्या गाडीच्या मंजुरीवर सोलापूरकरांना समाधान मानावे लागले.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on February 26, 2013 10:12 am