माजी केंद्रीय मंत्री तथा ‘वनराई’ चे संस्थापक डॉ. मोहन धारिया यांच्या निधनामुळे सोलापूरकरांशी असलेल्या त्यांच्या जिव्हाळय़ाच्या नात्याला उजाळा मिळाला आहे.  या निमित्ताने १९७७ सालच्या लोकसभा निवडणुकीतील जनता लाटेत डॉ. धारिया यांचे सोलापूरांशी नाते ‘धारिया मदाना’च्या माध्यमातून विशेषत्वाने दृढ झाले होते.
१९७७ च्या लोकसभा निवडणुकीत सोलापूर मतदार संघात काँग्रेसचे प्रस्थापित खासदार सूरजरतन दमाणी यांच्या विरोधात जनता पक्षातर्फे माजी खासदार आप्पासाहेब काडादी हे उभे होते. या निवडणुकीत जनता पक्षाचा झंझावात होता. त्या वेळी सिद्धेश्वर पंच कट्टय़ाजवळील खुल्या मदानावर जनता पक्षाच्या प्रचार सभा होत. या प्रचार सभांसाठी ना. ग. गोरे, जगन्नाथराव जोशी, मोहन धारिया, चंद्रशेखर आदी दिग्गज नेते याच मदानावर काँग्रेसच्या विरोधात जनमत तयार करीत होते. यात खऱ्या अर्थाने गाजले ते डॉ. मोहन धारिया. त्यांच्या सभेला इतका प्रचंड प्रतिसाद मिळाला, की त्यामुळे सभेच्या मदानाला मोहन धारिया यांचे नाव देण्यात आले होते. अर्थात, या निवडणुकीत काँग्रेसचे दमाणी यांचीच सरशी झाली होती.
कालांतराने डॉ. मोहन धारिया मदानाची मालकी ग्रामदैवत सिद्धेश्वर देवस्थान समितीची असल्याने या मदानावर देवस्थान समितीने सिद्धेश्वर व्यापार संकुल उभारले. त्यामुळे मोहन धारिया मदान लोप पावले. मात्र या ऐतिहासिक मदानाच्या स्मृती सोलापूरकरांनी मन:पटलात जपून ठेवल्या आहेत. डॉ. धारिया यांच्या निधनाने या ऐतिहासिक मदानाविषयाच्या स्मृतींना उजाळा मिळाला.
डॉ. मोहन धारिया यांचे अप्पासाहेब काडादी यांच्यासह सोलापूरचे झुंजार संपादक रंगाण्णा वैद्य यांच्याशी मत्रीचे संबंध होते. डॉ. धारिया ज्या ज्या वेळी सोलापुरात यायचे, त्या त्या वेळी रंगाण्णा वैद्य यांच्या दक्षिण कसब्यातील वाडय़ास आवर्जून भेट देत असत. तेथे भोजनासह गप्पांचा फड रंगत असे. बाबा कुसूरकर, पन्नालाल सुराणा, भीम रोणे, शंकर पाटील आदी स्थानिक नेत्यांशी त्यांचे जिव्हाळयाचे संबंध होते. कालांतराने डॉ. धारिया यांनी पर्यावरण बचावासाठी ‘वनराई’ संस्था उभी केली, त्या वेळी त्यांचा पुन्हा सोलापूरशी संबंध आला. रवींद्र राळेरासकर यांच्यावर सोलापुरातील वनराईची जबाबदारी सोपविण्यात आली होती. मात्र अलीकडे १५ वर्षांत डॉ. धारिया यांचा संपर्क नाहीसा झाला.