नागपूर जिल्ह्य़ातील व शहरातील सर्व शासकीय, निमशासकीय, ग्रामपंचायतीच्या इमारतींवर सौर ऊर्जा यंत्रे बसविण्याची योजना तयार करण्यात यावी, यासाठी यावर्षी १० कोटी रुपये उपलब्ध करून देण्यात येतील. सर्व कार्यालय प्रमुखांनी यासाठी प्रस्ताव सादर करावा, असे आवाहन पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी येथे केले.
आबासाहेब खेडकर सभागृहात पालकमंत्र्यांनी जिल्ह्य़ातील सर्व विभागाच्या प्रमुखांची २०१४-१५ मंजूर व प्राप्त अनुदान, अप्राप्त अनुदान व २०१५-१६ या वित्तीय वर्षांसाठी मागणी केलेल्या व करावयाच्या अनुदानाची लेखाशीर्षनिहाय आढावा बैठक घेतली. यावेळी आमदार सुनील केदार, सुधाकर देशमुख, आशीष देशमुख, समीर मेघे, नागो गाणार, अनिल सोले, प्रकाश गजभिये, जिल्हा परिषद अध्यक्ष निशा सावरकर, सभापती उकेश चव्हाण, मुख्य कार्यकारी अधिकारी शिवाजीराव जोंधळे उपस्थित होते. जिल्हाधिकारी अभिषेक कृष्णा यांनी जिल्हा नियोजन कामांचा विभागनिहाय आढावा घेतला. संचालन जिल्हा नियोजन अधिकारी कृष्णा फिरके यांनी केले.
जिल्ह्य़ातील ज्या शासकीय कार्यालयांना इमारती उभारावयाच्या असतील किंवा दुरुस्ती करावयाची असेल त्याचे प्रस्ताव येत्या तीन दिसतात सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधीक्षक अभियंत्यांकडे पाठवावेत. विशेषत: पोलिसांचे निवासस्थानांच्या दुरुस्तीचे प्रस्ताव तातडीने सादर करावे, असेही पालकमंत्र्यांनी बैठकीत सांगितले.
केंद्र व राज्य सरकार संयुक्तपणे राबवित येत असलेल्या योजनांचा निधी तातडीने मिळण्यासाठी प्रस्ताव तयार करावे व या प्रस्तावाची एक प्रत माझ्याकडे सादर करावी. जिल्ह्य़ातील विहिरींवर वीजपंप असलेल्या व नसलेल्या विहिरींची सांख्यिकी जिल्हाधिकाऱ्यांकडे तातडीने सादर करण्याचे निर्देशही पालकमंत्र्यांनी यावेळी दिले. रविनगर येथे शासकीय निवासस्थान बांधण्यासंदर्भात प्रस्ताव तयार करण्याची सूचना आमदार प्रकाश गजभिये यांनी बैठकीत केली. बैठकीत जलयुक्त शिवार अभियान योजनेचा आढावा घेण्यात आला. यावेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अर्चना कडू, उपविभागीय अधिकारी उपस्थित होते.