पाटण तालुक्यातील विविध भागातील डोंगरपठारावर आलेल्या विविध पवनऊर्जा कंपन्यांकडून होत असलेल्या गलथान कारभारामुळे येथील जनतेला आंदोलने करून उपोषणाचा मार्ग स्वीकारावा लागत आहे. तालुक्याच्या ठिकाणची पोलीस यंत्रणा ही पवनचक्की कंपन्यांच्या दावणीला बांधली आहे. यावर कोणाचाही अंकुश राहिला नसल्याचा आरोप माजी आमदार शंभूराज देसाई यांनी केला. दरम्यान, तालुक्यातील सर्वसामान्य जनतेला सातत्याने पवनचक्क्यांच्या कंपन्यांविरोधात आंदोलन करण्याची वेळ का येते, याचा पोलीस प्रशासनाने गांभीर्याने विचार करावा, अन्यथा पोलिसांविरुध्द जनतेतून उद्रेक होईल, याच यंत्रणेने भान ठेवावे असा इशारा देसाई यांनी पत्रकाद्वारे दिला आहे.
पत्रकात म्हटले आहे की, तालुक्यातील विविध पवनचक्की कंपन्यांकडून शेतकऱ्यांची फसवणूक करण्याचा उद्योग सध्या सुरू आहे. फसवणूक झालेला शेतकरी कंपन्यांच्या विरोधात आवाज उठविण्यास गेला असता, जीवे मारण्याची धमकी दिली जाते. पोलीस यंत्रणा त्यांच्या तक्रारीची दखल न घेता उलट त्याच्यावरच खंडणीसारखे गंभीर गुन्हे दाखल करीत आहे. या संदर्भात आपणाकडे मोरणा भागातील १२ तक्रारी पाटण पोलिसांच्या विरोधात आल्या आहेत. नुकतेच कोकीसरे आणि बाहे येथील ग्रामस्थांना बेमुदत उपोषण करावे लागले. जमिनी जाऊन हा अन्याय सहन कराव्या लागणाऱ्या जनतेमध्ये पवनचक्की कंपन्या आणि या अन्यायाची दखल न घेणारी पोलीस यंत्रणा यांच्या विरोधात उद्रेक निर्माण झाला आहे, पण ही वेळ तालुक्यातील जनतेवर का येते, याचा गांभीर्याने विचार होणे गरजेचे आहे. पवनचक्की कंपन्यांच्या दावणीला बांधलेल्या पोलीस यंत्रणेचा हा पात्याखालचा कारभार आम्ही सहन करणार नसल्याचा इशारा तालुक्यातील अन्यायग्रस्त शेतकऱ्यांनी दिला आहे. पवनचक्की कंपन्या आणि त्यांना आश्रय देणाऱ्या लोकप्रतिनिधींनी पाटण तालुका विकायला तर काढला नाही ना, असा प्रश्न निर्माण झाला असून, दमदाटी व दडपशाही करून जनतेच्या जमिनी बळकावणाऱ्या संबंधित पवनचक्क्या कंपन्यांना वेसन घालण्याची गरज आहे. पोलीस यंत्रणेवर कोणाचाही अंकुश राहिला नसल्याने यंत्रणेचे फोफावले आहे. त्यामुळे पवनचक्की कंपन्या व पोलीस यंत्रणा यांच्या अन्यायग्रस्त कारभाराचे धिंडवडे काढण्यासाठी लवकरच अन्यायग्रस्त शेतकऱ्यांना एकत्रित करून मोठे जनआंदोलन उभारणार आहे. त्यापूर्वी त्यांनी आपल्या कारभारात बदल करावा व जनतेवरील अन्याय थांबवावा, अन्यथा पोलीस यंत्रणेने कधीही न पाहिलेले जनआंदोलन केले जाईल. त्यातून होणाऱ्या परिणामास सामोरे जाण्याची तयारी ठेवावी असाही सक्त इशारा पत्रकात देण्यात आला आहे.