सिडकोच्या आदर्श ग्राम विकास योजनेला उरण तालुक्यातील जासई गावापासून सुरुवात करण्यात येत असून या योजने अंतर्गत तयार करण्यात आलेल्या घनकचरा व्यवस्थापन केंद्राच्या प्रकल्पाचे उद्घाटन शुक्रवारी सकाळी ११ वाजता सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक संजय भाटिया यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. या योजनेचीही सुरुवात असून सिडकोच्या ग्रामविकासाच्या योजनेतून गावांचा सर्वागीण विकास केला जाणार आहे.
सिडकोच्या माध्यमातून गावांच्या विकासाच्या योजना राबविल्या जात असून या योजनेत गावात नागरी सुविधा पुरविल्या जात आहेत. यामध्ये गावातील गटारे, रस्ते, शौचालये तसेच खेळासाठी मैदान, शाळा उभारल्या जात आहेत. याकरिता सिडकोने नियोजन केले आहे. त्याची सुरुवात प्रकल्पग्रस्तांचे दिवंगत नेते दि. बा. पाटील यांच्या जासई या मूळ गावापासून करण्यात येत आहे.
जासईमधील विद्यालयाची इमारत, गावातील गटारे, रस्ते इत्यादीच्या विकासाची कामे काढण्यात आली आहेत. याचाच एक भाग म्हणून गावातील घनकचऱ्याचे नियोजन करण्यासाठी घनकचरा व्यवस्थापन केंद्राचीही उभारणी करण्यात आली आहे.