कल्याण-डोंबिवली पालिका हद्दीतील कचऱ्याची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावण्याच्या ६० कोटी रुपये खर्चाच्या घनकचरा प्रकल्पास बुधवारच्या सर्वसाधारण सभेत मान्यता देण्यात आली. हा प्रकल्प शासनाकडे अंतिम मंजुरीसाठी पाठवण्यात येणार आहे. शासनाच्या मंजुरीनंतर या प्रकल्पाच्या कामास सुरुवात होणार आहे.
‘‘गेल्या चार वर्षांपासून पालिका प्रशासन या प्रकल्पाच्या अंमलबजावणीत टंगळमंगळ करीत आहे. कोणत्याही आयुक्ताने असे प्रकल्प मार्गी लावण्याची इच्छाशक्ती दाखवली नाही. असे विषय सभागृहात आले की फक्त गोलमाल उत्तरे देऊन नगरसेवकांना फितवायचे. त्यांच्यात मतभेद निर्माण करून मजा बघत राहायची एवढीच भूमिका आतापर्यंत प्रशासनाने प्रामाणिकपणे पार पाडली आहे.
त्यामुळे जनहिताचे हे महत्त्वाचे प्रकल्प रखडत आहेत’’ अशी टीका काँग्रेसचे नगरसेवक विश्वनाथ राणे यांनी महासभेत आयुक्त रामनाथ सोनवणे यांच्या समक्ष केली. घनकचरा प्रकल्प पूर्ण होण्यासाठी जसे अनेक सल्लागार आहेत. तसेच या प्रकल्प उभारणीत माहीर असलेले उपायुक्त संजय घरत यांचाही सल्ला आयुक्त सोनवणे यांनी घेतला तर बरा होंईल, असा टोमणा नगरसेवक राणे यांनी हाणला.
पालिका हद्दीत आगरी, कोळी समाज मोठय़ा प्रमाणात आहे. त्यांचे पारंपरिक शेती, मासेमारी व्यवसाय आहेत. त्यामुळे त्यांच्या व्यवसायांना बाधा येईल अशी कृती करून प्रशासन घनकचरा प्रकल्प टिटवाळा, मांडा, उंबर्डे भागांत उभारणार असेल तर त्याला कडाडून विरोध केला जाईल, असा इशारा भाजपच्या नगरसेविका उपेक्षा भोईर, पुष्पा भोईर यांनी दिला. मांडा, टिटवाळा, बारावे, उंबर्डे, कोपर अशा प्रस्तावित क्षेपणभूमीवर स्थानिक पातळीवरचा कचरा टाकून त्यावर प्रक्रिया करण्यात यावी म्हणजे कचऱ्याची समस्या कायमची मिटेल, असे मत बहुतेक नगरसेवकांनी व्यक्त केले. आधारवाडी क्षेपणभूमीची कचरा साठवणीची क्षमता संपल्याने उंबर्डे येथील ३२ एकर जागेवर पालिका घनकचऱ्याचा प्रकल्प राबवणार आहे. या प्रकल्प उभारणीला महासभेने यापूर्वीच मंजुरी दिली आहे. तरीही आधारवाडी क्षेपणभूमी शास्त्रोक्त पद्धतीने बंद करणे, बारावे, मांडा, टिटवाळा, उंबर्डे येथे कचऱ्याची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावणे, यांत्रिक झाडू खरेदी करणे असा प्रस्ताव प्रशासनाने महासभेत मंजुरीसाठी आणला होता.