वर्धा लोकसभा मतदारसंघातील काही रस्त्यांचे बांधकाम केंद्रीय मार्ग निधी योजनेच्या माध्यमातून पूर्ण करण्याची हमी केंद्रीय रस्ते व महामार्ग मंत्री ऑस्कर फ र्नाडिस यांनी खासदार दत्ता मेघेंना दिली आहे.
गुरुवारी दिल्लीत खासदार मेघे यांनी केंद्रीय मंत्री ऑस्कर फर्नाडिस यांची भेट घेऊन त्यांच्याशी रस्ते बांधकामांबाबत चर्चा केली. वर्धा लोकसभा मतदारसंघातील माल वाहतुकीसाठी महत्वाच्या रस्त्यांची दुर्दशा झाली असून याविषयी नागरिकांमध्ये मोठी नाराजी व्यक्त होते.
यासंदर्भात केंद्राकडून विशेष निधी मिळावा, यासाठी खासदार मेघे प्रयत्नशील होते. त्यास अखेर यश मिळण्याची शक्यता
फ र्नाडिस-मेघे भेटीने निर्माण झाली आहे. प्रामुख्याने मोर्शी-सालबर्डी, आष्टेगाव-गणेशपूर या मार्गाची मध्यप्रदेशच्या सीमेपर्यंतची दुरुस्ती व खडका-पांढरघाटी रस्त्याच्या दुरुस्तीची मागणी होते. अमरावती-पांढूर्णा मार्गावर वर्धा नदीवर पुलाची आवश्यकता व्यक्त करण्यात आली.
तसेच चांदूर-राजुरा, अंजनसिंगी-पुलगाव, लोणी-धानोरा-पापड, वर्धा जिल्ह्य़ातील आर्वी-वायगाव, हिंगणघाट-वायगाव, आर्वी-कापसी, कोरा-चिमूर या रस्त्यांच्या दुरुस्तीचा प्रस्ताव आहे. या रस्त्यांवरील व प्रामुख्याने समुद्रपूर तालुक्यातील मुख्य पुलांच्या दुरुस्तीचा प्रश्न खासदार मेघे यांनी मांडला. हे प्रश्न समजून घेऊन फ र्नाडिस यांनी कें द्रीय मार्ग निधीतून टप्प्याटप्प्याने या रस्त्यांच्या बांधकामासाठी निधी देण्याचे आश्वासन दिले. प्रथम टप्पा लवकरच मंजूर करू, अशी हमीही त्यांनी दिल्याची माहिती खासदार दत्ता मेघे यांच्या कार्यालयाने दिली. चर्चेच्या वेळी सागर मेघेही उपस्थित होते.