काही माणसं आयुष्यभर माणसांसाठी, समाजासाठी अविरत कार्य करीत असतात. खरे तर, सभोवतीचा अमानुषतेचा, अनीतीचा, अनैतिकतेचा, अनाचाराचा, व्यसनाधीनतेचा, वासनाधीनतेचा, अंधश्रद्धांचा अंधार संपवण्यासाठी ही माणसं सतत प्रयत्न करीत असतात. सभोवती अंधार आहे, अशी ओरड करीत राहण्यापेक्षा अंधार घालविण्यासाठी उजेड निर्माण करण्याची धडपड करणं त्यांना फार महत्त्वाचं वाटतं. अशा धडपडीतून चळवळ निर्माण होत असते. अशा धडपडीतूनच नवविचार जन्माला येत असतात. या माणसांना मात्र अनेक प्रकारच्या अडचणींना सामोरे जावं लागत असतं, पण अंधारावर विजय मिळवायचा असेल तर उजेड निर्मिल्याशिवाय गत्यंतर नाही, हे त्यांना जसं कळलेलं असतं, तसंच पुन्हा अंधाराचं साम्राज्य येऊ द्यायचं नसेल तर प्राणपणानं उजेडाची पणती जपली पाहिजे, हे देखील त्यांना कळलेलं असतं.अशा माणसांचे प्रयत्न, विचार, जगणं अनेकांना प्रेरणा देत असतं. ही माणसं कधी प्रसिद्धीच्या झोतात असतात, कधी अलक्षितही. या माणसांचं जगणं म्हणजे जिवंत चळवळी असतात.
अशी माणसं त्यांच्या चळवळी, त्यांच्या संदर्भात झालेल्या लेखनाविषयी, साहित्याविषयीचा ‘चळवळ आणि साहित्य’ हा स्तंभ वर्षभर लिहिला. पंधरा दिवसाला एक लेख, याप्रमाणे लेख प्रसिद्ध होत राहिले. केवळ एका रविवारचा अपवाद वजा जाता वर्षभर हा स्तंभ अगदी नियमित सुरू राहिला. वर्षभरात सुमारे चोवीस पंचवीस पुस्तकांविषयी लिहिता आलं,  पण या निमित्तानं चळवळीतूनच जन्मलेल्या साहित्याचा, लेखनाचा पोत तपासता आला. वेगवेगळ्या चळवळींच्या संदर्भातील लेखनाची स्थितीगती पाहता आली. प्रसिद्धीपासून दूर असणाऱ्या माणसांचं कार्य किती महत्त्वाचं आहे, ते समजून घेता आलं. सामाजिक, सांस्कृतिक पर्यावरणाचाही नव्यानं शोध घेण्याचा प्रयत्न करता आला. नव्या जाणिवांचा मनात जागर करणारं साहित्य या निमित्तानं वाचता आलं. पणती जपणाऱ्या हातांसाठी काही शब्द लिहिता आलं. खरं तर, चळवळींचा इतिहास सांगणं हे या लेखनाचं कधी उद्दिष्टच नव्हतं. सभोवतीच्या विधायक, विवेकवादी कार्याची नोंद घेणं, त्यांच्या कर्तृत्वाला सलाम करणं, हीच भूमिका या लेखनामागं होती. वर्षभराच्या मर्यादित काळात फार कमी माणसांची आणि चळवळींची दखल घेणं शक्य झाल, याची जाणीव मनात आहेच. अशा प्रकारच्या वाचनाची आणि लेखनाची सुरुवात करणं, हा माझ्या आयुष्यातला फार महत्त्वाचा भाग होता, हे देखील प्रामाणिकपणे नमूद केलं पाहिजं.
‘चळवळ आणि साहित्य’ हा स्तंभ गेल्या वर्षभरापासून सुरू असताना अनेक जाणकार वाचकांनी मौलिक सूचना केल्या, अनेकांनी पुस्तकं सुचवली. अनेकांनी वाचलेल्या पुस्तकांविषयी चर्चा केली. काही वाचकांनी लेखातील जाणवलेल्या उणिवांविषयी स्पष्ट प्रतिक्रिया व्यक्त केल्या. या चर्चा, प्रतिक्रिया, सूचनांचा फार फायदा झाला. या स्तंभासाठी शेवटचा लेख लिहिताना वाचकांविषयीच्या आदरानं आणि कृतज्ञतेनं मन भरून येणं स्वाभाविक आहे. या लेखनावरच्या जिव्हाळ्यापोटी सूचना करणाऱ्या, लेखनाविषयी अनुकूल प्रतिकूल प्रतिक्रिया व्यक्त करणाऱ्या सर्व सुजाण वाचकांचे मन:पूर्वक आभार.
हा स्तंभ लिहिताना वणी येथील लोकमान्य टिळक महाविद्यालयातील ग्रंथालयाचा फार उपयोग झाला. ग्रंथालयातील लेखन वाचन कक्षात बसून अनेक लेख लिहिलेले आहेत. या स्तंभ लेखनासाठी प्रत्यक्षा अप्रत्यक्षपणे या महाविद्यालयानं सहकार्य केलं आहे. प्राचार्य डॉ. शशिकांत आस्वले व या महाविद्यालयाचे मन:पूर्वक आभार. वणीचे माजी नगराध्यक्ष अरुण पटेल, अ‍ॅड. वासुदेव विधाते, जयंत कुचनकार, अनिल कुलकर्णी, सुनील गोवारदिपे           यांच्याशी वेळोवेळी झालेल्या चर्चा लेखनासाठी बळ देणाऱ्या ठरल्या. या सर्व लेखनाला ही मंडळी सतत सहकार्य करीत असतात. या सर्वाचा अकृत्रिम जिव्हाळा माझ्या आयुष्यातली जमेची बाजू आहे, या सर्वाचं आणि हे लेखन करताना सतत सहकार्य करणं, मजकूर टाईप करणं, पुस्तकाचं कव्हर स्कॅन करून ई-मेल करणं, असं अनेक प्रकारचं  सहकार्य अजय ऊर्फ ज्ञानेश्वर भिवरकर, विजय उपाध्ये, कार्तिक देशपांडे, जयंत शेंडे, पवन ढाले, जयंत त्रिवेदी यांनी वेळोवेळी केलं, त्यांचं मन:पूर्वक आभार. ‘लोकसत्ता’नं या स्तंभासाठी पुरेसं स्वातंत्र्य दिलं. तिथल्या ज्येष्ठांनी  सहकार्य केले, आवश्यक तेव्हा मौलिक मार्गदर्शन केले. या सर्वाचे आणि ‘लोकसत्ता’ चे मन:पूर्वक आभार.

tuberculosis marathi news, tuberculosis genetic sequencing marathi news
क्षयरोग उपचारामध्ये जनुकीय क्रमनिर्धारण महत्त्वपूर्ण, औषध प्रतिरोधकातील बदल समजण्यासाठी मदत
environment, elections, nations,
चारशे कोटी विसरभोळे?
Mentally healthy Psychotherapy Mental health problems
ताणाची उलगड: मानसिकदृष्ट्या निरोगी आहोत का?
it is bothering because social media is ahead of the times and we are behind
फरफट होतेय कारण समाज माध्यमे काळाच्या पुढे आहेत आणि आपण मागे…