अनेक केंद्रांवर सकाळपासून रांगेत उभे असणारे मतदार.. तर काही ठिकाणी दिसणारी तुरळक वर्दळ.. नवमतदारांच्या बरोबरीने ज्येष्ठांमध्ये दिसणारी उत्सुकता.. मतदार यादीत नांव शोधताना बहुतेकांची झालेली दमछाक.. यंत्रातील बिघाडामुळे एखाद्या केंद्रावर विलंबाने सुरू झालेली प्रक्रिया.. काँग्रेसच्या माजी नगरसेवकाला पैसे वाटताना पकडल्यानंतर निर्माण झालेला तणाव..  सिडकोत महिलांची छेडछाड केल्याच्या आरोप करत शिवसेनेने घेतलेली आक्रमक भूमिका.. कोणत्याही उमेदवाराला मतदान केल्यास एका विशिष्ट उमेदवाराला मत जात असल्याची तक्रार.. यादीत नांव नसल्याने मतदान न करता माघारी फिरण्याची नाहक ओढावलेली नामुष्की.. नाशिक व दिंडोरी लोकसभा मतदारसंघात गुरूवारी मतदान प्रक्रियेचा दिवस अशा अनेक वेगवान घडामोडींनी भरलेला होता. मतदानात दुपापर्यंत दिंडोरी मतदारसंघाने नाशिक मतदारसंघावर आघाडी घेतल्याचे पहावयास मिळाले.
नाशिक मतदारसंघात १६६४ मतदान केंद्र, दिंडोरी १७५० तर धुळे मतदारसंघातील मालेगाव मध्य, मालेगाव बाह्य व बागलाण तालुक्यातील ७७७ केंद्रांवर सकाळी सात वाजता मतदानास सुरूवात झाली. मतदान प्रक्रिया शांततेत पार पडावी याकरिता तब्बल दहा हजारहून अधिक पोलीस अधिकारी व कर्मचारी यांचा फौजफाटा तैनात करण्यात आला. तापमान ४० अंशांच्या आसपास असल्याने बहुतेकांनी सकाळीच मतदान करण्यास प्राधान्य दिले. मतदारांमध्ये विलक्षण उत्साह पहावयास मिळाला. उच्चभ्रु वसाहतीच्या कॉलेजरोड, गंगापूर रोड परिसरातील मतदान केंद्रांवर मतदारांची एकच गर्दी झाली. बॉईज टाऊन, बीवायके महाविद्यालय, वाघ गुरुजी विद्यालय, सिडको, पंचवटीतील क. का. वाघ महाविद्यालयात मतदारांच्या रांगा लागल्याचे दिसले. ज्येष्ठ नागरीक, अपंग व्यक्ती, महिला व प्रथमच मतदान करणारे मतदार असे सारे घटक उत्स्फुर्तपणे घराबाहेर पडले. ग्रामीण भागात यापेक्षा वेगळे वातारण नव्हते. झोपडपट्टी लगतच्या व दुर्गम भागातील काही मतदान केंद्रांवर दुपारी एक वाजेपर्यंत तुरळक स्वरुपात मतदान झाले. परंतु, सायंकाळी अशा सर्व केंद्रांवर मतदारांच्या रांगा लागल्याचे दिसले. निवडणूक यंत्रणेने मतदारांना प्रथमच मतदार चिठ्ठींचे वाटप केले होते. ज्यांना ही चिठ्ठी मिळू शकली नाही, त्यांना केंद्रावर त्या देण्याची व्यवस्था करण्यात आली. राजकीय पक्षांनी ठिकठिकाणच्या केंद्रांवर संगणकाद्वारे नांव शोधून देण्याची व्यवस्था केली होती. यादीतील घोळामुळे या ठिकाणी नागरिकांची मोठी झुंबड उडाली.
सिडकोतील ग्रामोदय शाळेत मतदान प्रक्रियेला सुरूवात झाल्यानंतर एका यंत्रात बिघाड झाल्याचे निदर्शनास आले. हे यंत्र बदलल्यानंतर तासाभराच्या विलंबाने या ठिकाणी मतदानास सुरूवात झाली. म्हसरुळच्या एका केंद्रावर व दिंडोरी तालुक्यातील एका केंद्रावर यंत्रात या स्वरुपाचा बिघाड झाला होता. सिडकोतील पेठे हायस्कूल केंद्रातील मतदान यंत्राबद्दल शिवसेनेच्या नगरसेविका हर्षां बडगुजर व शिवसैनिकांनी तक्रार केली. कोणालाही मतदान केल्यास मत हे काँग्रेस आघाडीच्या उमेदवाराला जात असल्याची तक्रार करण्यात आली. सातपूर परिसरात राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांनी पक्षचिन्ह असणारे साहित्य परिधान करुन केंद्रात प्रवेश केला. अशा काही कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.
सकाळी सात ते दुपारी एक या पहिल्या टप्प्यात नाशिक मतदारसंघापेक्षा दिंडोरी मतदारसंघात मतदानाचा वेग कित्येक पटीने अधिक होता. या कालावधीत नाशिकमध्ये चार लाख ४० हजार ४५९ तर दिंडोरीत तब्बल पाच लाख ३२ हजार मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. जिल्ह्यातील ६७ मतदान केंद्रांपैकी जवळपास निम्म्या केंद्रांवर सीसी टीव्ही कॅमेरे बसवून तेथील हालचालींवर नजर ठेवण्यात आली. मतदान केंद्रांवर कोणताही अनुचित प्रकार घडू नये याकरिता पोलिसांनी फिरती पथके ठिकठिकाणचा आढावा घेत होती. दोन्ही मतदारसंघातील उमेदवारांनी वेगवेगळ्या केंद्रांवर भेटी देऊन स्थितीचा अंदाज घेतला. मतदारांतील उत्स्फुर्तता पाहून काही उमेदवारांनी मतदानाची एकूण टक्केवारी ६० टक्क्यांहून अधिक होईल, असा विश्वास व्यक्त केला. दुपारी एक ते तीन या कालावधीत उन्हाच्या तडाख्यामुळे मतदान केंद्रावरील गर्दी काहिशी कमी झाली. परंतु, अखेरच्या टप्प्यात मात्र हळूहळू मतदार केंद्राकडे वळू लागले. सकाळी काहिसे रिते रिते भासणारे झोपडपट्टी परिसरातील केंद्रेही मतदारांच्या गर्दीने फुलली होती. गतवेळी मतदान केंद्र बळकावल्याची तक्रार झालेल्या बी. डी. भालेकर हायस्कूल केंद्र सायंकाळी मतदारांची एकच रिघ लागली.
सुधाकर बडगुजर ताब्यात
महापालिकेतील विरोधी पक्षनेते सुधाकर बडगुजर आणि पोलीस कर्मचारी यांच्यात सिडकोतील एका मतदान केंद्राबाहेर काही कारणावरून वादविवाद झाले. केंद्राच्या आवारात बडगुजर यांची मोटार लावण्यात आली होती. वास्तविक, केंद्राच्या परिसरात वाहने आणण्यास प्रतिबंध आहे. या वाहनाची पोलिसांनी झडती घेतली असता त्यात काही हत्यारे आढळून आली. या पाश्र्वभूमीवर, पोलिसांनी बडगुजर यांना ताब्यात घेत अंबड पोलीस ठाण्यात नेले. दरम्यान, याच भागातील अन्य एका मतदान केंद्रावर काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी महिलांची छेड काढल्याचा आरोप नगरसेविका हर्षां बडगुजर यांनी केला. या मुद्यावरून काँग्रेस व शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांमध्ये बाचाबाची झाल्याचे सांगितले जाते.
पैसे वाटप करणाऱ्या काँग्रेसच्या
माजी नगरसेवकास चोप
मतदानाच्या दिवशी मतदारांवर प्रभाव टाकण्यासाठी पैशांचे वाटप करणाऱ्या काँग्रेसचे माजी नगरसेवक बबलू पठाण यांना पोलिसांनी चोप दिला. पोलीस पथकाला पाहिल्यानंतर पठाणने काही रक्कम फेकून पळ काढण्याचा प्रयत्न केला. परंतु, पोलिसांनी त्याला शिताफीने ताब्यात घेतले. त्याच्याकडे १८ हजाराची रोकड आढळून आली. पठाण विरुद्ध भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याला अटक झाल्याचे वृत्त पसरल्यानंतर बागवानपुरा भागात तणावाचे वातावरण निर्माण झाले. परंतु, पोलिसांनी वाढीव कुमक मागवून बंदोबस्त तैनात केला. ग्रामीण भागातही या पध्दतीने पैसे वाटप झाल्याच्या तक्रारी झाल्या. सटाणा तालुक्यात धुळे मतदार संघातील काँग्रेस उमेदवारासाठी पैशांचे वाटप करणाऱ्या काही कार्यकर्त्यांना विरोधी पक्षातील कार्यकर्त्यांनी पकडले. परंतु, या प्रकरणी कोणतीही तक्रार आली नसल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.
भद्रकाली परिसरात खुलेआम पैसे वाटप
काँग्रेसच्या माजी नगरसेवकाला अटक झाल्यानंतरही भद्रकाली परिसरात दुपारनंतर खुलेआमपणे मतदारांना पैशांचे वाटप होत असल्याचे पहावयास मिळाले. या परिसरातील मतदान केंद्रात सकाळपासून फारसा उत्साह दिसला नाही. सकाळी अकराच्या सुमारास काँग्रेसच्या माजी नगरसेवकाला पैसे वाटप करताना पोलिसांनी पकडले. बागवानपुरा भागात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला. परंतु, भद्रकालीतील काजीपुरासह इतर भागात राजकीय पक्षांचे कार्यकर्ते वा पदाधिकारी खुलेआम नोटांची बंडले घेऊन फिरत असल्याचे दृष्टिपथास पडले. पैसे दिल्यानंतर
मतदारांना लगेच वाहनाने मतदान केंद्रावर पाठविले जात होते. मतदारांना पैशांचे प्रलोभन दाखविण्याची शक्यता असल्याने निवडणूक यंत्रणेने खास पथके तयार केल्याचे सांगितले गेले. तथापि, या पथकांचे चोरी छुप्या पध्दतीने चाललेल्या या आर्थिक व्यवहारांकडे दुर्लक्ष झाले.
सिन्नरच्या सुळेवाडी येथे गोंधळ
सिन्नर तालुक्यातील सुळेवाडी येथे गोडसे समर्थकांनी फोच्र्युना मोटारीतील एका व्यक्तीला अडवून तो मतदारांना पैशांचे वाटप करीत असल्याची तक्रार करत गोंधळ घातला. संतप्त कार्यकर्ते मोटारीची तोडफोड करण्याच्या तयारीत असल्याने पोलिसांनी हस्तक्षेप करत संबंधिताला ताब्यात घेऊन सिन्नर पोलीस ठाण्यात आणले. या मोटारीत ४० हजार रुपयांची रोकड आढळून आली. त्याबद्दल चौकशी केली असता ही व्यक्ती विंचूर येथील असून फळ व्यापारी असल्याची माहिती निष्पन्न झाली. या प्रकरणी सायंकाळी उशिरापर्यंत चौकशी सुरू होती.