हसनबाग, ताजबाग, दिघोरी, हुडकेश्वर, रामेश्वरी या पूर्व व दक्षिण नागपूरच्या पट्टय़ात गुरुवारी मतदानासाठी कुठे उत्साह तर कुठे निरुत्साह दिसून आला. ताजबागमध्ये सकाळी अकरा वाजेपर्यंत अत्यल्प मतदान झाले. सकाळी फिरायला गेलेले अनेकजण मतदान करूनच घरी परतले.
गुरुवारी सकाळी सात वाजता नागपुरात मतदानास सुरुवात झाली. काही ठिकाणी मतदान संथ गतीने सुरू होते. बिंझाणी सिटी महाविद्यालयातील खोली क्रमांक अकरामध्ये निवडणूक कर्मचाऱ्यांचे काम अगदीच संथ गतीने सुरू होते. त्यामुळे बाहेर मतदारांची मोठी रांग लागली होती. ‘उन्हाचा त्रास नको’, या उद्देशाने अनेक ठिकाणी मतदारांनी सकाळीच केंद्रावर जाणे पसंत केले. मॉर्निग वॉकला गेलेले मतदार मतदान करूनच घरी परतले. अनेकांनी सकाळी मतदान केले आणि परतताना भाजी घेऊन परतले. सक्करदरा, महाल आदी ठिकाणी हे दृश्य होते.
बिंझाणी सिटी महाविद्यालयात विविध खोल्यांमध्ये मतदान होते. त्यांचे क्रमांक असले तरी मतदारांना इमारतीत वेडेवाकडे वळण घेतच खोल्या शोधाव्या लागत होत्या. अनेक मतदान केंद्रांमध्ये किमान पंखेही नव्हते. सकाळपेक्षा दिवसभर मतदान कर्मचारी आणि मतदारही भाजून निघत होते. अंगातून घामाच्या धारा वाहत होत्या. मतदान केंद्राबाहेर मतदारांना यादीतील नावे शोधण्यासाठी विविध उमेदवारांचे प्रतिनिधी टेबल घेऊन बसले होते. त्यांच्यासाठी निवडणूक आयोगाने मांडव घालण्यास मनाई केल्याने दिवसभर उन्हात त्यांचे अक्षरश: हाल झाले. अनेक केंद्रांवर पिण्याच्या पाण्याची सोय नव्हती. शेजारी राहणाऱ्यांकडून पिण्यास पाणी आणावे लागत होते.
सकाळच्या वेळी तरुण मतदारांची संख्या तशी कमीच होती. दहा वाजेनंतर तरुणाई मतदानासाठी केंद्रांवर अवतरली. दक्षिण नागपुरातील मानवता हायस्कूलमधील मतदान केंद्राला भेट दिली असता या ठिकाणी मतदात्यांची मोठय़ा संख्येने गर्दी दिसून आली. या केंद्रावरील मतदात्यांचा उत्साह बघण्यासारखा होता. स्त्री, पुरुष, ज्येष्ठ नागरिक यांच्यासह प्रथमच मतदानाचा हक्क बजावणारे युवक- युवतीही मोठय़ा संख्येत रांगेत दिसून आल्या. येथेही मतदानाची प्रक्रिया शांततेत सुरू होती. या भागात काँग्रेस आणि बसपच्या मतदारांची संख्या मोठय़ा प्रमाणात असल्याने दोन्ही पक्षांचे प्रतिनिधी याठिकाणी मतदारांची विशेष विचारपूस करताना दिसून आले.
त्यासमोरील महापालिका शाळा, पार्वती नगरातील सनराईज कॉन्व्हेंट, रिंग रोडवरील साऊथ पॉइंट शाळा, तपस्या विद्यालय, जकाते हायस्कूल, भाजपचा गड समजल्या जाणाऱ्या रामभाऊ म्हाळगी नगराशेजारील मुडे हायस्कूल, आशीर्वाद नगरातील दादासाहेब ठवरे हायस्कूल व त्यासमोरील कॉन्व्हेंट या मतदान केंद्रावर सकाळी साडेदहा वाजता मतदारांची गर्दी होती. लांबवर रांगा लागल्या होत्या. मतदान केंद्रांबाहेर रस्त्यावर वाहनांची गर्दी झाली होती. मुडे हायस्कूलमध्ये गर्दी झाल्याने वरिष्ठ पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मुंढे यांच्यासह पोलीस ताफा पोहोचला.
ताजबागमध्ये निरुत्साह
मुस्लिमबहुल ताजबागमध्ये सकाळी अकरा वाजता अनुत्साहच दिसून आला. ताजबागमधील ताजबाग आयटीआयमधील दोन्ही मतदान केंद्रांवर अत्यल्प मतदार दिसून आले. अनेक दुकाने सुरू होती. हा परिसर काँग्रेसचा गड समजला जातो. एरवी येथे मतदानाचे प्रमाण चांगले असल्याने मतदारांचा हा अनुत्साह शंकेचे कारण ठरला. यासंबंधी काही ज्येष्ठ व तरुण पुरुष, महिला व तरुण मतदारांना बोलते करण्याचा प्रयत्न केला. ‘जायेंगे आरामसे अभी समय है’ असे काहीजण म्हणाले. अनेकांनी विद्यमान खासदारांप्रति नाराजी व्यक्त करीत ‘क्या करना व्होटिंग करके’ असा उद्विग्न सवाल केला. गुरुवार असूनही ताजबाग दग्र्यात दर्शनाला येणाऱ्यांची संख्याही अत्यल्पच दिसली.  
हसनबागमध्ये उत्साह
मुस्लिमबहुल हसनबागमध्ये या उलट स्थिती होती. तेथे मतदारांमध्ये उत्साह दिसून आला. तेथील कादरिया हायस्कूलमधील तीन मतदान केंद्रांवर सकाळी साडेअकरा वाजता सुमारे २३ टक्के मतदान झाले होते. हसनबाग परिसरातील अनेक दुकाने सुरू होती. दुपारी साडेबारा वाजता उंटखानातील महापालिकेच्या दोनही शाळा तसेच मिलिंद विद्यालयात मतदारांची चांगलीच गर्दी दिसून आली. मतदारांच्या रांगा लागल्या होत्या. महिलांसह पुरुषांचीही गर्दी दिसून आली.
दुपारच्या उष्म्याचाही मतदानावर मोठय़ा प्रमाणात परिणाम झाल्याचे दिसून आले. काही ठिकाणी मतदार याद्यांचा तसेच ओळखपत्रांचा घोळ, काहींनी मतदान न करण्याचा घेतलेला निर्णय अशा काही तुरळक घटनांव्यतिरिक्त शहरातील मतदान शांततेत पार पडले. पाराही चढू लागल्याने शहरातील अनेक भागातील मतदारांनी पहिल्या दोन तासातच मतदानाला भरघोस प्रतिसाद दिला. त्यामुळे मतदान सुरू झाल्याच्या पहिल्या काही तासातच मतदान केंद्रावर रांगा दिसत होत्या. सकाळच्या या सत्रात प्रामुख्याने वृद्ध मतदात्यांचा उत्साह पाहण्यासारखा होता. तर काही ठिकाणी प्रथमच मतदान करणारे युवा मतदारही उत्साहात त्यांचा हक्क बजावताना दिसत होते. मतदान करताना आलेला अनुभव एकमेकांना सांगत होते. मतदान करण्यापूर्वी वा मतदान करून बाहेर पडल्यावर बरेच जण परिचितांमध्ये स्वत:चे राजकीय विश्लेषण मांडताना दिसत होते. बहुतेक ठिकाणी मतदात्यांनी सुरुवातीच्या काही तासातच मोठय़ा प्रमाणात मतदान केल्याचे आढळून आले. सर्वच केंद्रांवर शांततेत मतदान सुरू होते. दक्षिण व पूर्व भागातही मतदात्यांनी दुपापर्यंत कमी अधिक प्रमाणात मतदान केले होते. मात्र, या भागांतील अनेक मतदान केंद्रांवर दुपारी तीन वाजेनंतर गर्दी दिसून आली. संवेदनशील असलेले हसनबाग, मोमीनपुरा, डिप्टी सिग्नल भागातील संजयनगर येथील मतदान केंद्रांवरही सकाळपासूनच गर्दी होती. या भागात मुस्लिम व छत्तीसगढी समाजातील जनता मोठय़ा प्रमाणात असून हे मतदार उत्साहीपणे मतदानाचा हक्क बजावताना दिसून येत होते. या सर्व मतदान केंद्रांवर पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त होता. यातील काही बुथवर तर मतदान प्रक्रियेचे व्हिडिओ शुटिंगही सुरू होते.

जंबो मतपत्रिका
विदर्भात सर्वाधिक म्हणजे ३३ उमेदवार रिंगणात होते. त्यामुळे केंद्राबाहेर लावलेली मतपत्रिकेचे प्रारुप वृत्तपत्राच्या आकाराएवढे होते. मतदान यंत्रावरही इच्छुक उमेदवाराचे बटन शोधावे लागत होते. त्यामुळे मतदानासही वेळ लागत होता. मतदान केंद्रावर पोहोचल्यानंतरही अनेक मतदार तेथील यादीत नाव आहे की नाही, याची शहानिशा करताना आढळले.

नववधूने बजावला मतदानाचा हक्क
दिघोरीच्या दिपाली मेश्राम या तरुणीने बोहल्यावर चढण्याआधी मतदानाचा हक्क बजावला. अगदी नववधूच्या वेशात तयार झालेली दिपाली मतदान केंद्रावर आली तेव्हा सर्वाच्या नजरा तिच्याकडे वळल्या. लग्न हे कर्तव्य असले तरीही मतदान हे पहिले कर्तव्य असल्याचे ती म्हणाली. सासरच्यांनी तिच्या या निर्णयाला पाठिंबा दिल्याचे तिने सांगितले. आयुष्यात ‘एन्जॉयमेंट’ कधीही करता येते, पण निवडणूक ही पाच वर्षांतून एकदाच येत आहे. त्यामुळे तरुणाईने कोणत्याही परिस्थितीत मतदानाचा हक्क सोडू नये, असा सल्ला तिने दिला.