राज्य शासन व उच्च तंत्र शिक्षण विभाग यांच्या वतीने देण्यात येणारा राज्यस्तरीय सर्वोत्कृष्ट स्वंयसेविका पुरस्कार २०११-१२ या वर्षांसाठी येथील सोनाली कसबे यांना उच्च व तंत्रशिक्षण मंत्री राजेश टोपे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून प्रभावीपणे काम करणाऱ्या विद्यार्थ्यांचा गौरव करण्यासाठी राष्ट्रीय, राज्य, विद्यापीठ तसेच जिल्हा या स्तरावर पुरस्कार देण्यात येतो.
केटीएचएम महाविद्यालयातून पदवी घेतलेल्या सोनाली कसबे यांनी २०१२ मध्ये प्रजासत्ताक दिनी दिल्ली येथे आयोजित कार्यक्रमात राष्ट्रीय सेवा योजनेच्या पथकाचे नेतृत्व केले होते.
दीपक बैरागी प्रवक्तेपदी
अखिल भारतीय वैष्णव बैरागी परिषदेचे प्रवक्ते म्हणून येथील दीपक बैरागी यांची तीन वर्षांसाठी निवड करण्यात आली आहे. बैरागी यांची परिषदेचे अंतर्गत लेखा परीक्षक म्हणूनही निवड झाली आहे.
चंद्रकांत बैरागी उपाध्यक्ष, देविदास बैरागी कोषाध्यक्ष यांची २०१६ पर्यंत पुनर्नियुक्ती करण्यात आली आले.
महिलांमध्ये अकोला येथील भगवती वैष्णव आणि पुणे विभागातून मधुमती वैष्णव यांची निवड करण्यात आली.
राज्य अध्यक्ष नारायणदास वैष्णव यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत सिंहस्थाबाबत चर्चा करण्यात आली.
प्रा. डॉ. सुरेश पाटील
यांची नियुक्ती
नाशिक येथील यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या नाशिक विभागीय केंद्र संचालकपदी मुख्यालयातील मूल्यमापन विभागाचे संचालक प्रा. डॉ. सुरेश पाटील यांनी कार्यभार स्वीकारला. नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, नगर या जिल्ह्यांतील शिक्षणापासून वंचित घटकांना उच्च शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात मोठय़ा संख्येने आणण्यासाठी डॉ. पाटील विशेष प्रयत्न करणार आहेत.