परळी आगाराने सोनपेठ बस बंद केल्याच्या निषेधार्थ शिवसेनेने पुकारलेल्या ‘सोनपेठ बंद’ला चांगला प्रतिसाद मिळाला. दिवसभर बाजारपेठ बंद होती. उद्याही (शुक्रवार) हा ‘बंद’ सुरू राहणार आहे.
खराब रस्त्याचे कारण देत परळी आगाराने परळी-सोनपेठ बस बंद केली. त्यामुळे प्रवाशांचे हाल होत आहेत. तालुक्यातील जनतेला परळी ही सर्वात मोठी बाजारपेठ आहे. परंतु आगाराच्या धोरणामुळे सोनपेठकडे येणाऱ्या सर्वच फेऱ्या आठ दिवसांपासून रद्द केल्या आहेत. त्यामुळे २२ किलोमीटर अंतराला २४ रूपये तिकीट असताना खासगी वाहन चालक ६० ते ७० रुपये उकळत आहेत. साहजिकच प्रवाशांची आर्थिक पिळवणूक होत आहे.
परळी-सोनपेठ बस पूर्ववत सुरू करावी, गंगाखेड व पाथरी आगारांनी सोनपेठमाग्रे परळी बसफेऱ्या सुरू कराव्यात, या मागण्यांसाठी शिवसेनेने गुरुवारपासून बेमुदत ‘बंद’चे आवाहन केले. त्यास व्यापाऱ्यांनी प्रतिसाद देत दुकाने बंद ठेवली. सरकारी कार्यालये वगळता सर्वच खासगी व्यवसाय, सेवा बंद होत्या. त्यामुळे शहरात शुकशुकाट होता. उद्याही ‘बंद’ कायम राहणार आहे. दरम्यान, एस. टी. महामंडळाने ‘बंद’ची संध्याकाळपर्यंत कोणतीही दखल घेतली नव्हती. शिवसेनेने तहसीलदारांना निवेदन दिले. उपजिल्हाप्रमुख मधुकर निरपने, तालुकाप्रमुख रंगनाथ रोडे, शहरप्रमुख विष्णू मस्के आदींच्या सह्य़ा आहेत. किराणा दुकानदार संघटना, कापड रेडीमड संघटना, कृषीकेंद्र संघटना, सराफा असोसिएशन, जनरल स्टोअर संघटना, केमिस्ट अॅन्ड ड्रगिस्ट संघटना, पानपट्टी, हॉटेल, नाभी आदी संघटना ‘बंद’मध्ये सहभागी आहेत.