राज्यातील आपत्कालीन वैद्यकीय सेवा कार्यक्रमांतर्गत राष्ट्रीय व राज्य महामार्गावरील अपघात स्थळांसाठी रुग्णवाहिकांच्या जागा निश्चित करण्यात आल्या असून धुळे ग्रामीण मतदार संघातून जाणाऱ्या राज्य व राष्ट्रीय महामार्गासाठी सहा अद्ययावत रुग्णवाहिका २६ जानेवारीपासून सुरू करण्यात येणार आहेत.
या बाबतची माहिती प्रा. शरद पाटील यांनी दिली. या रुग्णवाहिका २४ तास महामार्गावर उपलब्ध राहणार असून या रुग्णवाहिकांत प्रत्येकी आठ तासांसाठी एक तज्ज्ञ डॉक्टर, एक मदतनीस कायमस्वरुपी उपलब्ध राहणार आहे. राज्यात नव्याने सुरू होणाऱ्या आपत्कालीन सेवा कार्यक्रमांतर्गत राज्यातील महामार्गावर रुग्णवाहिका सेवा सुरू होत आहे. पुणे येथील भारत विकास ग्रुप रुग्णवाहिकांचे नियंत्रण करणार असून या सेवेच्या तज्ज्ञ सेवेसाठी वैद्यकीय अधिकाऱ्यांना प्रशिक्षणही देण्यात आले आहे. अपघातग्रस्त रुग्णांचे प्राण वाचविण्यासाठी सर्व सोईंनी युक्त अशा सुसज्ज रुग्णवाहिका असून या सेवेत धुळे जिल्ह्याचा समावेश करून कृती आराखडा तयार करताना जास्तीत जास्त रुग्णवाहिका देण्याची मागणी आ. प्रा. पाटील यांनी केली होती. मागील वर्षी जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठकीत महामार्गावरील अपघातांचा विषयावर गांभीर्याने चर्चा करण्यात आली होती. धुळे जिल्ह्यात रस्त्यांवर होणाऱ्या अपघातात मरण पावणाऱ्यांची संख्या मोठी आहे. रक्तदान शिबिराद्वारे संकलित होणारे बहुतेक रस्ते अपघातातील जखमींना द्यावे लागते, अशी माहिती आ. प्रा. पाटील यांनी संबंधित विभागापर्यंत पोहोचविली. अपघातग्रस्त रुग्णांना वेळेवर उपचार मिळाला नाही आणि अपघातग्रस्तांना रुग्णालयापर्यंत पोहोचविले नाही तर त्यांचा मृत्यू होण्याची दाट शक्यता असते. यामुळे रुग्णवाहिका अपघातग्रस्तांसाठी जीवनदायी ठरणार आहे.