13 August 2020

News Flash

कन्नडमध्ये मुख्यमंत्र्यांपुढे इच्छुकांचा ‘सूर’

कन्नड तालुक्यात शिवसेनेचे संघटन उभारणारे माजी आमदार नामदेव पवार यांनी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत सोमवारी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. याच तालुक्यातून काँग्रेसचे नेते नितीन पाटील लोकसभा निवडणूक लढविण्यास

| February 18, 2014 01:25 am

कन्नड तालुक्यात शिवसेनेचे संघटन उभारणारे माजी आमदार नामदेव पवार यांनी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत सोमवारी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. याच तालुक्यातून काँग्रेसचे नेते नितीन पाटील लोकसभा निवडणूक लढविण्यास इच्छूक आहेत. मात्र, पक्षाचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी ठरविलेल्या नव्या निकषामुळे उमेदवारी कोणाला मिळेल, हा प्रश्न अनुत्तरित असल्याने जाहीर सभेत पाटील यांनी, ‘नामदेवरावांना विधानसभेत उमेदवारी द्यायची असेल तर माझीही सोय लावा,’ असा ‘सूर’ आळवला. पवार यांनी सेना सोडल्याने काँग्रेसला त्याचा लाभ होईल, असे सांगतानाच मुख्यमंत्री चव्हाण यांनी, गेल्या काही वर्षांत निवडणुकांपूर्वी आमच्या काही चुका झाल्या. एकमेकांचे पाय ओढले गेले. चुकीच्या हातात सुकाणू गेला तर अवघड होऊन बसते, असे सांगितले.
निवडणुकीपूर्वी नाराज कार्यकर्ते पक्ष बदलू लागले आहेत. कन्नडचे आमदार हर्षवर्धन जाधव यांनी शिवसेनेत प्रवेश केला. त्यामुळे नामदेव पवार अस्वस्थ होते. हातात हात घालून काम करू, असे नितीन पाटील व नामदेव पवार यांनी जाहीरपणे सांगितले खरे. पण माझी सोय लावा, हे सांगायला दोघेही विसरले नाहीत.
कन्नड येथे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, महाराष्ट्राचे प्रभारी मोहन प्रकाश, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांच्या उपस्थितीत पवार यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. प्रवेश सोहळ्यानिमित्त पवार यांनी खासदार चंद्रकांत खैरे यांच्यावर टीका केली. ‘खैरेंएवढा लाचार खासदार कधी पाहिला नाही. लाचारी किती, तर खैरेंनी तिसऱ्या पिढीचे पाय धरले! तालुक्यात एकही चांगले काम केले नाही. तालुक्यातून मताची आघाडी मात्र कायम मिळविली,’ अशी तोफ त्यांनी डागली.
कन्नड तालुक्यातील सत्ता १५ वर्षांपासून एकाच कुटुंबाकडे आहे. त्यामुळे आता बदल व्हायला हवा, असेही पवार म्हणाले. या वेळी कन्नडचे काही महत्त्वाचे प्रश्नही मुख्यमंत्र्यांसमोर मांडण्यात आले. राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक आठ-आठ तास खोळंबते. त्यामुळे चाळीसगाव घाटातील बोगद्याचे काम तातडीने व्हावे. पिशोर तालुका व्हावा. कन्नड शहराला शिवना टाकळीतून पाणीपुरवठय़ाची ३० कोटींची योजना मंजूर करावी आदी मागण्या पाटील यांनी केल्या.
महसूलमंत्री थोरात यांनी पाटील यांचे काम चांगले असल्याचे आवर्जून सांगितले. तळमळीने काम करणारा कार्यकर्ता आहे. जिल्हा बँकेचे अध्यक्ष सुरेश पाटील यांनीही या भागात कार्यकर्ते जोडले. अनेकांच्या सुख-दु:खात ते सहभागी असतात, असे थोरात म्हणाले. नितीन पाटील हे सुरेश पाटील यांचे चिरंजीव आहेत. नितीन पाटील यांच्या कामाचा थोरात यांनी केलेला हा उल्लेख, तसेच माझी सोय लावा हो, असा नितीन पाटील यांनी आळविलेला ‘सूर’ लक्षात घेता काँग्रेसमधून उमेदवारीसाठी नितीन पाटील यांचे नाव पक्षांतर्गत निवडणुकीत पेरले जाऊ शकते, अशी चर्चा कार्यक्रमानंतर होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 18, 2014 1:25 am

Web Title: sound of willing in front of cm in kannada
Next Stories
1 सेनेत निष्ठावंत बाजूला, उपऱ्यांनाच संधीचा घाट!
2 महिलेचा मृतदेह थेट तहसील कार्यालयात!
3 पाणीप्रश्नी शेकापने दंड थोपटले
Just Now!
X