नवी मुंबईतील एकमेव सांस्कृतिक व्यासपीठ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वाशी येथील विष्णुदास भावे नाटय़गृहातील ध्वनी यंत्रणेत बिघाड झाला आहे. दोन दिवसांपूर्वी झालेल्या ‘मी नथुराम गोडसे बोलतोय’ या नाटय़प्रयोगाच्या वेळी अभिनेते शरद पोंक्षे यांचे संवाद प्रक्षेकांपर्यंत पोहचू शकला नाही. त्यामुळे प्रेक्षक, नाटय़कलाकार यांचा काहीसा हिरमोड झाला. पोंक्षे आणि प्रेक्षकांनी याबाबत नाराजी व्यक्त केली आहे. भावे नाटय़गृहातील समस्या दिवसेंदिवस वाढू लागल्याने आता मी भावे नाटय़गृह बोलतोय असा एक समस्यांचा नाटय़प्रयोग भावेमध्ये आयोजित करण्याची वेळ प्रक्षेकांवर येणार आहे. समस्या उग्र रूप धारण करीत असताना प्रशासन मात्र दुर्लक्ष करीत आहे.
सिडकोकडून १७ वर्षांपूर्वी हस्तांतरित करून घेतलेले वाशी येथील नाटय़गृह अलीकडे पालिकेला पांढरा हत्ती म्हणून पोसावे लागत आहे. पालिकेला या नाटय़गृहाच्या वार्षिक डागडुजीपोटी ८० लाख रुपये खर्च करावे लागत असल्याने, या वास्तूकडे फारसे गांर्भीयाने पाहिले जात नाही. त्यामुळे नाटय़गृहाच्या समस्या दिवसेंदिवस वाढू लागल्या आहेत. उंदीर, डास, पाल यासारख्या प्राण्यांचा वावर नाटय़गृहात वाढला आहे. त्यामुळे प्रेक्षक निवांत नाटय़प्रयोग पाहू शकतील याची खात्री नाही. काही दिवसांपूर्वी मनसेचे शहर अध्यक्ष गजानन काळे यांनी आयुक्त दिनेश वाघमारे यांच्या समोर येथील समस्यांचा पाढा वाचला. त्यानंतरही नाटय़गृहातील समस्यांची सोडवणूक झाली आहे, असे म्हणता येणार नाही.
ध्वनीव्यवस्था १७ वर्षे जुनी
नाटय़गृहातील ध्वनीव्यवस्था १७ वर्षे जुनी असल्याने त्यात अनेक बिघाड झालेले आहेत. त्यामुळे ऐन कार्यक्रम रंगात आलेला असताना प्रेक्षकांचा हिरमोड होणे ही नित्याची बाब होऊ लागली आहे. शनिवारी संध्याकाळी साडेचार वाजता मी नथुराम गोडसे बोलतोय या नाटय़प्रयोगाच्या वेळी अभिनेते शरद पोंक्षे यांच्या गंभीर संवादांची धार या ध्वनी यंत्रणेच्या दोषामुळे बोथट झाली. बऱ्याच वेळा आवाज तुटला जात असल्याने पोंक्षे यांचाही हिरमोड झाला. प्रेक्षकांनी संयम दाखविल्याने थोडय़ा वेळाने हा आवाज सुरळीत करण्यात आला, मात्र ही बाब आता नित्याचीच झाल्याने काही नाटय़निर्मात्यांनी भावे व्यवस्थापकांकडे नाराजी व्यक्त केली आहे.
मी नथुराम बोलतोय नाटय़प्रयोगाच्या वेळी शनिवारी थोडा ध्वनिदोष निर्माण झाला होता. ही बाब खरी आहे. त्यानंतर हा दोष दूर करण्यात आला. नाटय़गृहातील यंत्रणा दुरुस्त करण्यात यावी यासाठी इलेक्ट्रिक विभागाला कळविण्यात आले आहे.
नैनेश दुदले,     उपव्यवस्थापक, भावे नाटय़गृह