उमेदवार निवडीच्या राहुल फॉम्र्युल्यातून औरंगाबादचे नाव गळाल्यानंतर ‘मीच कसा योग्य उमेदवार’ हे सांगण्यासाठी काँग्रेसच्या बैठकीत इच्छुक उमेदवारांनी घोषणायुद्ध केले. माजी खासदार उत्तमसिंह पवार व नितीन पाटील यांच्या समर्थकांनी ‘आगे बढो’च्या घोषणा देत निवडणूक निरीक्षकांसमोर अक्षरश: धुडगूस घातला. निरीक्षकांनी मात्र त्या कार्यकर्त्यांच्या भावना होत्या, असे म्हणत प्रकरणावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला.
लोकसभा निवडणुकीसाठी औरंगाबादमधून माजी खासदार पवार यांचे प्रयत्न सुरू आहेत. मतदान केंद्रापर्यंत बांधणी पूर्ण झाल्याचा दावा ते जवळपास प्रत्येकाकडे करतात. काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांना मीच योग्य उमेदवार असल्याचे ते सांगत असतात. विशेषत: या मतदारसंघात ‘ओबीसी’ चेहरा विजयी होतो, असा दावाही ते नेहमी करतात. दुसरीकडे काँग्रेसमधील नेत्यांनी जिल्हा बँकेचे माजी संचालक नितीन पाटील यांचे नाव पुढे केले आहे. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हेही त्यांच्या निवासस्थानी जाऊन आले होते. याचे राजकीय अर्थ लावा, असेही आवर्जून सांगितले जाते. राहुल गांधी यांचा फॉम्र्युला लागू नसल्याने या दोन्ही उमेदवारांच्या समर्थकांनी शुक्रवारी झालेल्या बैठकीत जोरदार घोषणाबाजी केली. या गदारोळामुळे निरीक्षकही चांगलेच चिडले. ते कार्यकर्त्यांवर डाफरले. मात्र, पत्रकारांशी बोलताना कार्यकर्त्यांच्या भावना असतात, असे म्हणून त्यांनी या विषयावर पडदा टाकला.