पश्चिम विदर्भात पेरण्यांच्या कामांनी गती घेतली असून आतापर्यंत २५ टक्के क्षेत्रात पेरा पूर्ण झाला आहे. त्यात कपाशीचे क्षेत्र सर्वाधिक आहे. चार दिवसांच्या विश्रांतीनंतर रविवारी अमरावती विभागात बहुतांश ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरींनी पेरण्यांसाठी अनुकूल वातावरण तयार केले. या विभागात पावसाने सरासरी ओलांडली असून धरणांमध्येही ३० टक्के जलसंचय झाला आहे.
अमरावती विभागातील सरासरी लागवडीखालील ३२ लाख ८३ हजार हेक्टर क्षेत्रापैकी आतापर्यंत ७ लाख ५० हजार हेक्टर क्षेत्रात पेरण्या आटोपल्या आहेत. या पेरण्यांना पावसानेही आधार दिला आहे. लातूर विभागानंतर राज्यात अमरावती विभाग पेरणीत आघाडीवर आहे. लातूर विभागात ३० टक्के क्षेत्रात पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. पेरणीसाठी अनुकूल वातावरण कायम राहिल्यास येत्या आठवडय़ात संपूर्ण पश्चिम विदर्भात पेरण्या आटोपतील, असे चित्र आहे. अमरावती विभागात सर्वाधिक लागवडीखालील पिकाचे क्षेत्र सोयाबीनचे बनले आहे. त्यापूर्वी ही जागा कपाशीची होती. पण, गेल्या दशकात कापसाच्या भावातील चढउतार, पिकाचा वाढलेला खर्च, हेक्टरी उत्पादनात वाढ न होणे, अशा विविध कारणांमुळे शेतकऱ्यांचा भ्रमनिरास होत गेला आणि बहुतांश शेतकरी सोयाबीनकडे वळले. पण, कपाशीचे सरासरी क्षेत्र १० लाख ८० हजार हेक्टर क्षेत्रापर्यंत स्थिर राहिले. सोयाबीनचे क्षेत्र १० लाख ९८ हजारापर्यंत पोहोचले. यंदा ते वाढण्याचे संकेत आहेत. आतापर्यंत अमरावती विभागात सर्वाधिक ३ लाख ४६ हजार हेक्टर क्षेत्रात कपाशीची लागवड करण्यात आली आहे. हे क्षेत्र सरासरीच्या ३३ टक्के आहे.  त्याखालोखाल २५ टक्के क्षेत्रात म्हणजे २ लाख ७७ हजार हेक्टरमध्ये सोयाबीनचा पेरा वाढला आहे.
पश्चिम विदर्भातील काही भागात चाऱ्याची टंचाई निर्माण झाली होती. शेतकऱ्यांनी यंदा पीक आणि चारा या दुहेरी हेतूने मक्यालाही पसंती दिली आहे. विभागात मक्याच्या लागवडीखालील सरासरी क्षेत्र ६५ हजार हेक्टर आहे. आतापर्यंत १८ हजार हेक्टर म्हणजे २७ टक्के क्षेत्रात मक्याचा पेरा झाला आहे. गेल्या काही वर्षांत तुरीला चांगला भाव मिळू लागल्याने तुरीचे क्षेत्रही वाढत चालले आहे. विभागात तुरीचे सरासरी क्षेत्र ३ लाख ८२ हजार हेक्टर आहे. त्यापैकी ६२ हजार हेक्टर (१६.२ टक्के) क्षेत्रात तूर बहरली आहे. खरीप ज्वारीच्या लागवडीखालील सरासरी २ लाख ९० हजार हेक्टर क्षेत्रापैकी १० हजार ७०० हेक्टरमध्ये ज्वारीचा पेरा झाला आहे. हे क्षेत्र ४ टक्के आहे. मुगाचे सरासरी क्षेत्र २ लाख हेक्टर आहे. आतापर्यंत २२ हजार हेक्टरमध्ये मुगाचा पेरा झाला आहे. हे क्षेत्र ११ टक्क्यांपर्यंत पोहोचले आहे. बुलढाणा जिल्ह्य़ात आतापर्यंत १९७ मि.मी. (सरासरीच्या १३९ टक्के) पावसाची नोंद झाली आहे. अकोला जिल्ह्य़ात २४२ मि.मी. (१७८ टक्के), वाशीम ३८१ मि.मी. (२३२ टक्के), अमरावती २३७ मि.मी. (१६३ टक्के), तर यवतमाळ जिल्ह्य़ात २३५ मि.मी. (१३४ टक्के) पावसाची नोंद करण्यात आली आहे. धरणांच्या पाणलोट क्षेत्रात चांगला पाऊस झाल्याने मोठय़ा सिंचन प्रकल्पांमध्ये ३३ टक्के, मध्यम प्रकल्पांमध्ये ३४ टक्के, तर लघू प्रकल्पांमध्ये २१ टक्के जलसाठा झाला आहे.