काँग्रेसचा छुपा कार्यक्रम भाजप राबवत आहे. मात्र, दोन्ही पक्ष सारखेच आहेत. काँग्रेसची नीती चांगली, परंतु नियत खराब आहे, असा आरोप समाजवादी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार आबू आझमी यांनी येथे केला. राज्यात सपा लोकसभेच्या १५ जागा लढविणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
आझमी गुरुवारी विवाह सोहळ्यानिमित्त हिंगोलीत आले होते. शासकीय विश्रामगृहावर पत्रकार बठकीत ते बोलत होते. सपाचे राज्य सरचिटणीस विलास खरात यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. आपण स्वत: कोणत्याही मतदारसंघातून लोकसभेची उमेदवारी दाखल करणार असल्याचेही आझमी यांनी सांगितले. भाजप, काँग्रेसवर टीका करताना राज्यातील आघाडी सरकार भ्रष्टाचारी व घोटाळेबाज असल्याचा आरोप त्यांनी केला. देशात तिसऱ्या आघाडीची सत्ता येणार असल्याचे भाकित वर्तवून सपाचे राष्ट्रीय अध्यक्ष मुलायमसिंग यादव हेच तिसऱ्या आघाडीचे नेतृत्व करतील, असे सूतोवाच त्यांनी केले.
शरद पवार काँग्रेसवर टीका करतात. परंतु त्यांना काँग्रेसशी आघाडीशिवाय पर्याय नाही, असे मत व्यक्त करतानाच मोदी पंतप्रधान होणे शक्य नसल्याचा दावाही त्यांनी केला. राज्यात टोलवसुली बंदच करायला हवी, असेही ते म्हणाले. हुसेन दलवाई मतलबी नेते असल्याचा आरोप त्यांनी केला.