‘लोकसत्ता’च्या ‘सर्व कार्येषु सर्वदा’ उपक्रमाची फलश्रृती
अभिजात भारतीय संगीताचे जतन, संवर्धन आणि प्रशिक्षणात गेल्या आठ दशकांहून अधिक काळ कार्यरत कल्याण गायन समाज या संस्थेने शास्त्रीय गायनाच्या मैफलींसाठी खास अद्ययावत सभागृह उपलब्ध करून दिले आहे. कल्याणमधील टिळक चौकातील संस्थेच्या नव्या इमारतीत दुसऱ्या मजल्यावर असलेले हे संपूर्णत: वातानुकूलित सभागृह परिसरातील इतर संस्थांनाही संगीतविषयक उपक्रमांसाठी माफक दरात दिले जाणार आहे. दोन वर्षांपूर्वी गणेशोत्सवात ‘लोकसत्ता सर्वकार्येषु सर्वदा’ उपक्रमात संस्थेच्या कार्याचा परिचय करून देणारा लेख प्रसिद्ध झाल्यानंतर देशभर संस्थेच्या कार्याची ओळख झाली. त्यातूनच स्टेट बँक ऑफ इंडियाने दिलेल्या १६ लाख रुपयांच्या देणगीतून कल्याण गायन समाजाच्या इमारतीत २०० आसन क्षमतेचे अद्ययावत सभागृह उभारण्यात आल्याची माहिती संस्थेचे प्रशांत दांडेकर यांनी वृत्तान्तशी बोलताना दिली. केवळ संगीतविषयक उपक्रमांसाठी असणारे हे महाराष्ट्रातील एकमेव सभागृह ठरणार आहे.
१९२६ पासून कल्याण शहरात कार्यरत असणाऱ्या गायन समाजाचा शास्त्रीय संगीताचे विद्यापीठ असा लौकिक आहे. अलीकडेच कल्याण शहरातील टिळक चौकात संस्थेची नवी इमारत उभारण्यात आली. या इमारतीत सध्या प्रामुख्याने संगीताचे प्रशिक्षण दिले जाते. संस्थेकडे संगीतविषयक हजारो पुस्तके असून एका संदर्भ ग्रंथालयाद्वारे ती अभ्यासकांना उपलब्ध करून दिली जाणार आहेत. अनेक नामवंत गायक आणि वादकांच्या संगीत मैफलींचे दुर्मीळ ध्वनिमुद्रण संस्थेकडे उपलब्ध असून ते डिजिटल स्वरूपात जतन करण्याची प्रक्रिया सुरू आहे. इच्छुकांना संस्थेच्या दालनात ते ऐकण्यासाठी उपलब्ध करून दिले जाणार आहे. दरवर्षी डिसेंबर महिन्यात देवगंधर्व महोत्सव साजरा केला जातो. त्यात राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय ख्यातीचे कलावंत आपली कला सादर करतात. देशातील प्रतिष्ठित संगीत महोत्सवांमध्ये आता त्याची गणना होऊ लागली आहे. खास संगीत मैफलींसाठी उभारण्यात आलेल्या सभागृहामध्ये संगीतविषयक माहितीपटही दाखविण्यात येतील. कल्याण गायन समाजाच्या या इमारतीत एक ध्वनिमुद्रण कक्षही (रेकॉर्डिग स्टुडिओ) लवकरच कार्यान्वित केला जाणार असून नवोदित गायक-वादकांना ही सुविधा ‘ना नफा ना तोटा’ तत्त्वावर दिली जाणार आहे.
रविवारी उद्घाटन
येत्या रविवारी ३ ऑगस्ट रोजी संस्थेच्या वर्धापन दिनाने औचित्य साधून सकाळी साडेदहा वाजता संस्थेच्या पांडुरंग-प्रभा सभागृहाचे उद्घाटन स्टेट बँकेच्या सरव्यवस्थापिका संजुक्ता राजगुरू आणि म्हैसकर फाऊंडेशनचे डी. पी. म्हैसकर यांच्या विशेष उपस्थितीत होणार आहे. त्यानंतर सुप्रसिद्ध बासरीवादक पं. रोणू मुजुमदार यांची मैफल होणार असून त्यांना पृथ्वीराज मिश्र (तबला) साथ करणार आहेत.