News Flash

वेगाने वाहन चालविणाऱ्यांविरोधात पोलिसांची विशेष मोहीम

मैत्री दिनाचे औचित्य साधून पोलीस यंत्रणेने बेभान वाहन दामटविणाऱ्यांविरोधात कारवाईचे सत्र राबविले असले तरी शहरात अशी कित्येक ठिकाणे आहेत की, जिथे राजरोस अतिश्रीमंत महाविद्यालयीन तरूणांकडून

| August 6, 2013 09:11 am

आधी ‘स्टाईल’ नंतर ‘धूम’
मैत्री दिनाचे औचित्य साधून पोलीस यंत्रणेने बेभान वाहन दामटविणाऱ्यांविरोधात कारवाईचे सत्र राबविले असले तरी शहरात अशी कित्येक ठिकाणे आहेत की, जिथे राजरोस अतिश्रीमंत महाविद्यालयीन तरूणांकडून मोटारसायकलींच्या कसरतींचा अक्षरश: उच्छाद मांडला जातो. रविवारी आसाराम बापू पुलालगतच्या रस्त्यावर अशाच कसरती करताना दोन तरूण जखमी झाले. या पाश्र्वभूमीवर, सोमवारी परिसरात बंदोबस्त तैनात करत पोलिसांनी कसरतकार वाहनधारकांना चाप लावण्याचा प्रयत्न केला. परंतु, धनाढय़ कौटुंबिक पाश्र्वभूमी आणि राजकीय वरदहस्त असे संदर्भ संबंधितांविरोधात कठोर कारवाई करताना अडसर ठरतात. आता खुद्द राज्याच्या गृहमंत्र्यांनी ‘धूम स्टाईल’ रपेट मारणाऱ्यांविरोधात राज्यभर कारवाई करण्याचे सुतोवाच केले असल्याने वेग मर्यादेचे पालन न करता इतर वाहनधारक व पादचाऱ्यांचा जीव धोक्यात आणणाऱ्या अशा वाहनधारकांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्यासाठी पोलीस यंत्रणा कोणती पावले उचलते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
कॉलेजरोड, गंगापूर रोड, महात्मानगर आणि खास करून आसाराम बापू आश्रमालगतच्या पुलावरून गोदावरी नदीच्या पलीकडे जाणारा रस्ता ही गर्भश्रीमंत वाहनधारक धेंडांची आवडती ठिकाणे. साधारण दुचाकींच्या तुलनेत संबंधितांच्या मोटारसायकली जादा क्षमतेच्या असल्याने त्याचे खुलेआम प्रदर्शन करण्याची खुमखुमी आवरली जात नाही. उलट विद्यार्थिनीचा घोळका दिसला की, वेग वाढवून सर्वाचे लक्ष वेधण्याचा त्यांच्याकडून प्रयत्न केला जातो. त्यात कित्येकदा अपघात घडलेले आहेत. या कसरतींमुळे कॉलेजरोड परिसरात वास्तव्यास असणाऱ्या नागरिकांना जीव मुठीत धरून रस्ता ओलांडावा लागतो. महात्मानगर, गंगापूररोड परिसरातील नागरिकांची यापेक्षा वेगळी स्थिती नाही. प्रमुख रस्त्यांवर धुमाकूळ घालणाऱ्या वाहनधारकांची नजर एक ते दीड वर्षांपासून आसारामबापू पुलाजवळील रस्त्यावर पडली आणि पाहता पाहता नदीच्या पलीकडील हा शांत परिसर कसरतींचे प्रमुख केंद्र बनून गेला. गंगापूर रस्त्यावरील बहुतांश रहिवासी या परिसरात फेरफटक्यासाठी जातात. याच ठिकाणी विस्तीर्ण हिरवळ असल्याने पालकही लहान मुलांना खेळण्यासाठी घेऊन जातात. परंतु, या सर्वाना दुचाकीस्वारांच्या कसरतींपासून प्रथम स्वत:चा बचाव करावा लागतो.
होरायझन अकॅडमीच्या समोरील पुलावरून मखमलाबादकडे जाणारा रस्ता आणि आसारामबापू पुलावरून पलीकडील परिसर या भागात हा विस्तीर्ण रस्ता आहे. दिवसभरात कोणत्याहीवेळी महाविद्यालयीन तरूण-तरूणींचे घोळके येथे भ्रमंती करताना दृष्टिस पडतात. शहरातील प्रमुख महाविद्यालयांपासून हा परिसर हाकेच्या अंतरावर असल्याने धूम स्टाईलने वाहन चालविणाऱ्यांना त्याचे विशेष आकर्षण. त्यातही रस्त्यावर लांबलचक दुभाजक असल्याने पोलीस यंत्रणा दाखल झाली तरी त्यांना सहजपणे पसार होणे शक्य होते. मोटारसायकलवर हात सोडून उभे राहणे, भरधाव वाहन उडविणे, अचानक ब्रेक मारून मागील चाक हवेत उंच उडविणे, एकमेकांशी स्पर्धा करत चाललेली ‘रेसिंग’.. असे एक ना अनेक साहसी प्रकार येथे पहायला मिळतात.
मोटारसायकलवर कसरती करणाऱ्यांमध्ये बहुतांश तरूण हे अतिश्रीमंत घरातील असतात. बरीच कसरत करून पोलिसांनी कोणाला पकडले तरी, कुटुंबियांकडून त्यांच्या चुकांवर पांघरूण टाकण्याचा प्रयत्न केला जातो, असे पोलीस अधिकारी सांगतात. कारवाईत दुसरा अडथळा आहे तो राजकीय प्रभृतींचा. धूम स्टाईलने वाहनेोमटविणाऱ्यांविरोधातील कारवाईत नेहमीप्रमाणे राजकीय दबाव येत असतो.
कुटुंबिय वा राजकीय क्षेत्रातून पाठबळ मिळाल्याने या तरूणांची भीड चेपते आणि मग, ते सुसाट सुटण्यास मोकळे होतात. जागतिक मैत्री दिनाच्या दिवशी या परिसरात नेहमीप्रमाणे कसरती सुरू असताना अपघात झाले आणि दोन तरूण जखमी झाले. पोलिसांनी तातडीने धाव घेऊन बंदोबस्त तैनात केला. सोमवारी कॉलेजरोड व आसाराम बापू परिसरात हा बंदोबस्त कायम राहिल्याने उपरोक्त परिसर वाहने दामटविणाऱ्यांपासून काहिसा मुक्त राहिला. परंतु, कायमस्वरूपी ही स्थिती निर्माण होण्यासाठी उपरोक्त वाहनधारकांवर कोणत्याही प्रकारचा दबाव झुगारून कठोर कारवाई होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

गुन्हे दाखल चालकांमध्ये गर्भश्रीमंतांच्या मुलांचा समावेश
धूम स्टाईलने वाहन चालविणाऱ्यांविरोधात पोलिसांनी सुरू केलेल्या मोहिमेदरम्यान आसाराम बापू आश्रम व परिसरात सापडलेल्या ८ जणांविरुद्ध गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. वाहतूक परवाना नसताना भरधाव वाहन चालविणे, क्षमतेहून अधिक जणांची वाहतूक, मद्यसेवन करत मोटारसायकल चालविणे असे या गुन्ह्यांचे स्वरूप आहे. या प्रकरणी जगन विठ्ठल मोरे (३०, आनंदवल्ली), दीपक बळीराम कांबळे (२३, त्रिमूर्ती चौक, सिडको), रामदास सिताराम गोबाळे (२९, हिराबाग), मयुर विजय गुळवंचकर (२५, मोरया अपार्टमेंट, कॉलेज रोड) जयेश चैनराम पवार (२१, शिवपार्वती पार्क, त्रिमूर्ती चौक सिडको), हर्षल महेश पंजवानी (१९, विहार बंगला, कॉलेज रोड), केव्हीयन जयेश ठक्कर (१९, शिवमनगर, हिरावाडी, पंचवटी), किरण वसंतराव घोलप (३८, सुयश चेंबर्स, गंगापूररोड) यांच्याविरुद्ध वेगवेगळ्या कलमांन्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. एकटय़ा गंगापूर पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील ही भरधाव वाहने चालविणाऱ्यांची स्थिती असून शहरातील उर्वरित भागातही ‘धूम स्टाईल’ वाहनधारकांचा असाच उच्छाद सुरू असतो. 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 6, 2013 9:11 am

Web Title: special campaign by police against rush drivers
Next Stories
1 इतिहासप्रेमी
2 शासकीय रुग्णालयात आता सीसी टीव्ही कॅमेऱ्यांची नजर
3 सत्ताधाऱ्यांविरोधात महाआघाडी स्थापन करण्याचे प्रयत्न निष्फळ
Just Now!
X