साईबाबा समाधी शताब्दी महोत्सवाच्या नियोजनासाठी माझ्या अध्यक्षतेखाली सुकाणू समितीची स्थापना करुन नियोजनाचा विकास आराखडा येत्या तीन वर्षांत पूर्ण करण्यात येईल. प्रस्तावीत आराखडय़ानुसारच सन २०१८ मध्ये होणाऱ्या श्री साईबाबा शताब्दी महोत्सवाचे नियोजन केले जाईल अशी ग्वाही मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिली.
साईबाबा संस्थान व भक्त के. व्ही. रमणी (हैद्राबाद) यांच्या संयुक्त सहकार्याने शिर्डी येथे उभारलेल्या साई आश्रम (फेज-१) या भक्तनिवास इमारतीचे उद्घाटन आज मुख्यमंत्र्याच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कृषिमंत्री राधाकृष्ण विखे होते. महसुलमंत्री बाळासाहेब थोरात, सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील, जिल्ह्याचे पालकमंत्री बबनराव पाचपुते, ज्येष्ठ नेते बाळासाहेब विखे , केंद्रीय रस्ते वाहतूक राज्यमंत्री सत्यनरायण, खासदार भाऊसाहेब वाकचौरे, दानशूर साईभक्त के. व्ही. रमणी, आ. अशोकराव काळे, आ. भाऊसाहेब कांबळे, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष जयंत ससाणे, शिर्डीच्या नगराध्यक्षा सुमित्रा कोते आदी यावेळी उपस्थित होते.
निळवंडे धरण व कालवे पूर्ण करण्यासाठी वाढीव निधी उपलब्ध करून हा प्रकल्प लवकर पुर्ण करण्याचे आश्वासन श्री. चव्हाण यांनी दिले. ते म्हणाले, खंडकरी शेतकऱ्यांच्या जमिनी वाटपासंदर्भात ज्या काही समस्या असतील त्यांचे निराकरण करण्यासाठी तातडीने पावले उचलली जातील. साईबाबा संस्थाने दुष्काळासाठी दिलेल्या २५ कोटी रुपये मदतीचा वापर दुष्काळग्रस्तांचे आश्रू पुसण्यासाठी केला जाईल. तात्पुरत्या योजना करण्यापेक्षा कायमस्वरुपी योजना राबविण्याचा प्रयत्न आहे. देशाच्या इतिहासात साईभक्त रमणी या खाजगी उद्योजकाने एवढी मोठी देणगी देण्याचा उच्चांक प्रस्थापित केला आहे. राज्यातील उद्योजकांनी त्यांच्या उत्पन्नातील नफ्याच्या चार टक्के रक्कम समाज विकासासाठी द्यावी असे आवाहन चव्हाण यांनी केले.
कृषिमंत्री राधाकृष्ण विखे यांनी गोदावरी कालव्यांच्या पाण्याबाबत नाशिक जिल्ह्य़ात होत असलेल्या गलथानपणाबद्दल नाराजी व्यक्त केली. पिण्याचा तसेच शेतीच्या पाण्याचा प्रश्नही गंभीर झाला आहे. नाशिक औद्योगिक वसाहत, महानगरपालिका व शीतपेय कंपन्यांच्या पाण्यात २५ ते ३० टक्के कपात करावी, औद्योगिक वसाहतीतील कारखाने एका पाळीत चालवावे. त्यातून वाचलेले पाणी शेती व पिण्यासाठी गोदावरी कालव्यातून तातडीने सोडण्यासाठी आपण आपल्या विषेश अधिकाराचा वापर करावा, या नियोजनासाठी तातडीने मुंबई येथे बैठक घ्यावी अशा मागण्या त्यांनी केल्या. खंडकरी शेतकऱ्यांच्या प्रश्नात शेती महामंडळ व जमीन वाटपाचे नकाशे यात विसंगती येत असल्याने खंडकरी शेतकऱ्यांमध्ये असंतोष वाढत आहे. तो कमी करण्यासाठी मुख्यमंत्री व महसुलमंत्र्यांनी प्रयत्न करावे अशी विनंती त्यांनी केली.
केंद्रीय राज्यमंत्री सत्यनारायण, पालकमंत्री पाचपुते यांची भाषणे झाली. के. व्ही. रमणी यांनी यावेळी मनोगत व्यक्त केले. संस्थानच्या त्रिसदस्य समितीचे अध्यक्ष जयंत कुलकर्णी यांनी प्रास्तविक व उपस्थितांचे स्वागत केले. रमणी यांना संस्थानच्या वतीने मानपत्र देऊन त्यांचा सत्कार केला. मुख्यमंत्री सहाय्यता निधीस संस्थाने २५ कोटी रुपयांचा धनादेश मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्त केला.
विखेंच्या भाषणात निळवंडेचे नारे
कृषिमंत्री राधाकृष्ण विखे यांनी मतदारसंघातील विविध प्रश्नांकडे मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधले. मात्र त्यात निळवंडे धरण व कालव्यांचा उल्लेख न केल्यामुळे निळवंडे पाटपाणी कृती समितीच्या कार्यकर्त्यांनी निळवंडेच्या मुद्यावर बोला, निळवंडे पाटपाणी कृती समितीचा विजय असो अशी नारेबाजी केल्याने एकच गोंधळ उडाला. नंतर मंत्री विखे यांनी प्रकल्प कालव्यासह वर्षभरात पूर्ण करण्याची मागणी केली.