लहान मुलांच्या हृदयशस्त्रक्रियेसाठी केईएम रुग्णालयात विशेष शस्त्रक्रिया विभाग तसेच या मुलांसाठी स्वतंत्र विभाग सुरू करण्यात येणार असल्याची तसेच चार ‘हार्ट-लंग’ मशीन्स खरेदी करण्यात येणार असल्याची माहिती मुंबई महानगरपालिकेतर्फे गुरुवारी उच्च न्यायालयात देण्यात आली. या चारपैकी दोन मशीन्स केईएम, तर लोकमान्य टिळक रुग्णालय व नायर रुग्णालयात प्रत्येकी एक मशीन बसविण्यात येणार असल्याचेही न्यायालयाला सांगण्यात आले. हृदय शस्त्रक्रियेसाठी आवश्यक ती यंत्रसामग्री उपलब्ध नसल्याने ७०० हून अधिक लहानग्यांच्या हृदयावरील शस्त्रक्रिया प्रलंबित असून काही मुलांचा मृत्यूही झाल्याची बाब वृत्तपत्रात प्रसिद्ध झाल्यानंतर न्यायालयाची त्याची गंभीर दखल घेत स्वत:हून याचिका दाखल करून घेतली होती. मुख्य न्यायमूर्ती मोहित शहा आणि न्यायमूर्ती मनोज संकलेचा यांच्या खंडपीठासमोर या प्रकरणी सुनावणी झाली. त्या वेळी पालिकेच्या वतीने अ‍ॅड्. मिलिंद साठे यांनी ही माहिती दिली. आतापर्यंत केवळ केईएम रुग्णालयात एकच मशीन उपलब्ध होते. त्यामुळे दिवसाला केवळ दोन ते तीनच शस्त्रक्रिया करणे शक्य होते. परिणामी दोन वर्षांत शस्त्रक्रियेचा सल्ला देण्यात आलेल्या लहान मुलांची यादी वाढत गेली. गुरुवारच्या सुनावणीत अ‍ॅड्. साठे यांनी मशीन खरेदीसाठी आवश्यक प्रक्रिया सुरू करण्यात आली असून सहा आठवडय़ात त्या केईएम, नायर आणि लोकमान्य टिळक रुग्णालयात बसविण्यात येतील, असे न्यायालयाला सांगितले. न्यायालयाने त्यावर ही सगळी माहिती प्रतिज्ञापत्राद्वारे पुढील आठवडय़ात सादर करण्याचे आदेश पालिकेला दिले.