वर्तमानपत्रांचे मुख्य कर्तव्य म्हणजे सर्वसामान्यांना जगताना भेडसावणारे प्रश्न, भासणारी आव्हाने यावर सातत्याने आवाज उठवणे आणि त्यांचे जगणे सुकर होईल यासाठी प्रयत्न करणे. व्यवस्था चालवणारे कोणत्याही पक्षाचे असोत, चांगले वर्तमानपत्र हे वाचकांच्या बाजूनेच असायला हवे.‘लोकसत्ता’ गेली ६६ वर्षे हेच करीत आला आहे, हे आपण जाणताच. ठाणे आणि परिसरात ही जबाबदारी अधिक चांगल्या पद्धतीने पार पाडता यावी यासाठी आज वर्धापन दिनाच्या मुहूर्तावर आम्ही ‘लोकसत्ता ठाणे’ हा नवीन उपक्रम सुरू करीत आहोत. त्या मागील भूमिका ही की ठाण्यासारख्या परिपूर्ण होऊ पाहणाऱ्या शहरासाठी वर्तमानपत्रही संपूर्ण हवे. मुख्य अंकाची कथित पुरवणी देऊन या शहरातील वाचकांची होत असलेली बोळवण थांबवणे आवश्यक होते.
ls_newsthane15edit

याचे कारण एकेकाळी केवळ मुंबईचे उपनगर इतकीच ओळख असलेले ठाणे शहर आणि जिल्हा आता बऱ्याच अंशी स्वयंपूर्ण झाला असून, अनेक जण पहिला पर्याय म्हणून ठाणे शहराची निवड करताना दिसतात. मग ते सामान्य नागरिक असोत किंवा शास्त्रज्ञ, कलाकार वा उद्योजक किंवा अन्य. अशा वेळी ठाण्यासाठीच वाहिलेले म्हणून एक संपूर्ण दैनिक असणे गरजेचे होते. ती गरज ‘लोकसत्ता ठाणे’ पूर्ण करील, अशी मला खात्री आहे. त्याच वेळी आसपास आणि जगातही काय सुरू आहे याची साद्यंत खबरबात आणि विश्लेषण देणारा ‘लोकसत्ता’चा मुख्य अंकही ‘लोकसत्ता ठाणे’समवेत आहेच.या प्रयोगाच्या यशासाठी आम्हाला एका घटकाची मदत लागेल. तो घटक म्हणजे तुम्ही.हे नवे वृत्तसंक्रमण कसे वाटते ते जरूर कळवा.

आपला,
Untitled-1