25 February 2021

News Flash

मसाप घटनादुरुस्तीला दीर्घ प्रतीक्षेनंतर मुहूर्त!

मराठवाडा साहित्य परिषदेच्या विद्यमान कार्यकारी मंडळाने प्रस्तावित घटनादुरुस्तीत अनेक बदल सुचविले असून, त्यावर शिक्कामोर्तब करण्यासाठी मसापची विशेष सर्वसाधारण सभा रविवारी (दि. १५) सकाळी ११

| September 11, 2013 01:49 am

सध्याच्या घटनेतील पळवाटांचा आधार घेत, मुदत संपल्यानंतरही अधिकारपदावर असलेल्या मराठवाडा साहित्य परिषदेच्या विद्यमान कार्यकारी मंडळाने घटनादुरुस्तीसाठी प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर मुहूर्त काढला आहे.
प्रस्तावित घटनादुरुस्तीत अनेक बदल सुचविले असून, त्यावर शिक्कामोर्तब करण्यासाठी मसापची विशेष सर्वसाधारण सभा पुढील रविवारी (दि. १५) सकाळी ११ वाजता औरंगाबाद येथील यशवंतराव चव्हाण नाटय़गृहात होईल. सभेची सूचना (नोटीस) कार्यवाह कुंडलिक अतकरे यांनी १३ ऑगस्टला जारी केली. ती सर्व सभासदांना टपालाद्वारे पाठविण्यात आली. सभेत केवळ घटनादुरुस्तीवर विचार होईल, असे पत्रात नमूद केले आहे. पत्रात सोबत घटनादुरुस्तीचा मसुदा, अशी तळटीप टाकली असली, तरी अनेक सभासदांना केवळ पत्रच प्राप्त झाले आहे. मसाप घटनादुरुस्तीचा विषय मागील अनेक वर्षांपासून प्रलंबित होता. निवृत्त न्यायाधीश नरेंद्र चपळगावकर यांच्या अध्यक्षतेखालील समितीने सध्याच्या घटनेत महत्त्वाचे बदल करून तयार केलेला मसुदा एकदा सर्वसाधारण सभेसमोर ठेवला होता, पण त्या वेळी तो फेटाळला गेला. ठाले पाटील यांच्या अध्यक्षतेखालील कार्यकारी मंडळाची मुदत संपून बराच काळ लोटला, तरी घटनादुरुस्तीच्या सबबीखाली निवडणूक लांबणीवर पडत गेली. या पाश्र्वभूमीवर १५ सप्टेंबरच्या विशेष सभेत घटनादुरुस्ती या एकमेव विषयाला बहुमताने मान्यता मिळाल्यास येत्या काही महिन्यांत निवडणुकीचा मार्ग मोकळा होईल.
घटनादुरुस्ती मसुद्यात निवडणुकीसंदर्भात महत्त्वाचे बदल सुचविण्यात आले आहेत. तसेच आजीव सदस्यत्वासाठी असलेल्या शुल्कात २०० रुपयांवरून ३ हजार रुपये शुल्क प्रस्तावित केले असून, मसाप स्थापनेपासून असलेला सर्वसाधारण सभासद हा प्रकार मोडीत काढण्याचे प्रस्तावित आहे. दरवर्षी १५ रुपयांची पावती फाडून सर्वसाधारण सभासद होण्याची सोय साहित्यप्रेमींना होती. पण सध्याच्या घटनेतील यासंबंधीचे कलम ७.२ (ऊ) वगळण्याचे घटनादुरुस्ती समितीने प्रस्तावित केले आहे. तसेच सन्माननीय सभासद- कलम ७ हेदेखील रद्द करण्याची शिफारस केली आहे. नव्या घटनेत सभासदांचे आश्रयदाते (२५ हजार), आजीव (३ हजार रुपये), संलग्न संस्था प्रतिनिधी (५ हजार रुपये) असे वर्ग प्रस्तावित असून, या सर्वाना आजीव सभासद मानले जाईल. उपकत्रे, सहायक, हितचिंतक आदी सभासद प्रकारही बाद ठरविण्याचे प्रस्तावित आहे.
विद्यमान घटनेनुसार कार्यकारी मंडळाचा कार्यकाल ५ वर्षांचा आहे. घटनादुरुस्तीत तो तसाच कायम ठेवला आहे. पण कार्यकारी मंडळ निवडणूक लांबणीवर टाकत असेल तर त्याला प्रतिबंध करणारी कोणतीही तरतूद दुरुस्तीच्या मसुद्यात नाही. उलट कार्यकारी मंडळाला सहा महिने मुदतवाढीची सोय करून दिली जात आहे. मुख्य म्हणजे पुढील कार्यकारी मंडळ निवडून येईपर्यंत पूर्वीचे कार्यकारी मंडळ चालू राहील, अशी पळवाट कायम ठेवली जात आहे. परिषदेच्या कार्यकारी मंडळाच्या विद्यमान रचनेत महत्त्वाचे व धाडसी बदल प्रस्तावित असून कलम ७.२मध्ये नमूद केलेले अ, ब, क या वर्गातील सर्व सभासद मिळून आता २१ सदस्य कार्यकारी मंडळावर निवडून देतील. पण त्यात प्राधान्यक्रम असला पाहिजे, अशी सूचना सर्वसाधारण सभेत उचलून धरली जाण्याची शक्यता आहे.
परिषदेच्या कार्यकारी मंडळावर सध्या १५ सदस्य निर्वाचित असतात. त्यात सहाजणांची वाढ प्रस्तावित आहे. विश्वस्त मंडळ अध्यक्षासोबत आता कार्यवाहही कार्यकारी मंडळाचे पदसिद्ध सदस्य होतील. मात्र, स्वीकृत तसेच आमंत्रित सदस्य हा प्रकार रद्द करण्याची शिफारस घटनादुरुस्तीत केली आहे.
मराठवाडय़ाच्या आठही जिल्हय़ांमध्ये मसापच्या आजीव सदस्यांची संख्या मोठी आहे. येत्या विशेष सभेला अनेक सभासद उपस्थित राहण्याची शक्यता आहे. त्यांची ओळख पटावी, यासाठी सभेला हजर राहणाऱ्या सभासदास फोटो ओळखपत्र सक्तीचे आहे. सभेला उपस्थित राहणाऱ्यास प्रवासखर्च देय नसल्याचेही पत्रात स्पष्ट केले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 11, 2013 1:49 am

Web Title: special meeting of msp on 15 sept in aurangabad
Next Stories
1 हुडकोच्या पथकाकडून घरकुलांची पाहणी
2 जि. प. समित्यांच्या सभा की, ‘टूर, टूर..?’
3 वाळूची चोरटी वाहतूक; सहा गाडय़ा पकडल्या
Just Now!
X