आपल्या आगळ्या व्यवस्थापन शैलीने जेवणाच्या डब्यांची ने-आण करणाऱ्या मुंबईच्या डबेवाल्यांचा आगळा गौरव करण्याचे भारतीय टपाल विभागाने ठरविले आहे. डबेवाल्यांच्या सन्मानार्थ टपाल खात्याकडून २३ जानेवारी रोजी विशेष टपाल पाकिट प्रकाशित करण्यात येणार आहे.
मुंबईत ‘जीपीओ’ (मुख्य टपाल कार्यालय), छत्रपती शिवाजी टर्मिनसजवळ येथे २३ ते २५ जानेवारी या कालावधीत ‘मुंबई पेक्स’ हे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. या प्रदर्शनाच्या पहिल्या दिवशी सकाळी साडेदहा वाजता ‘जीपीओ’मध्ये होणाऱ्या कार्यक्रमात या विशेष टपाल कव्हरचे प्रकाशन केले जाणार आहे. डबेवाले हे मुंबईचे भूषण असून त्यांच्या व्यवस्थापन शैलीचे जगातही कौतुक झाले आहे. विशेष टपाल कव्हरच्या माध्यमातून भारतीय टपाल खात्याने मुंबईच्या डबेवाल्यांचा हा गौरव केला आहे, ही आमच्यासाठी नक्कीच आनंदाची बाब असल्याचे मुंबई जेवण डबे वाहतूक मंडळाचे प्रवक्ते सुभाष तळेकर यांनी सांगितले.‘जीपीओ’मध्ये आयोजित केलेले ‘मुंबई पेक्स’ हे प्रदर्शन २५ जानेवारीपर्यंत सकाळी १० ते सायंकाळी ७ या वेळेत सर्वासाठी खुले आहे.