लग्न ठरविण्यापासून होईपर्यंत आणि पुढे झाल्यावरसुद्धा ‘लग्ना’मुळे निर्माण झालेले प्रश्न संपत नाहीत. हे प्रश्न जसे मुलामुलींना पडतात तसे ते सासू-सासऱ्यांनाही पडतात. म्हणूनच सासू-सासऱ्यांच्या मनातील प्रश्नांना उत्तरे देण्यासाठी ‘लोकसत्ता’ जीवनसाथी, अनुरूप परिवार आणि अनुरूप विवाह संस्था यांच्या वतीने सायंकाळी ५.३० वाजता माहीमच्या दादर-माटुंगा कल्चरल सेंटरमध्ये खास कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम विनामूल्य असून भावी आणि सध्याच्या सासू-सासऱ्यांना या कार्यक्रमाला उपस्थित राहता येईल.
पूर्वी लग्नानंतर नव्या घरात कसे जुळवून घ्यायचे याची नव्या सुनेला भीती असायची. आताच्या भावी सासूंना सून कशी असेल, तिच्याशी माझे जमेल की नाही, ती माझ्या लेकाला कब्जात घेणार तर नाही, लग्नानंतर आपले घरातील स्थान काय असणार आहे असे अनेक प्रश्न सतावत असतात. तर मुलांच्या शिक्षणासाठी वेळप्रसंगी कर्ज काढले, त्याने मोठे व्हावे म्हणून धडपड केली याची जाणीव मुलांना राहील का, पुढेमागे जर मुलाने त्याच्या घरासाठी व्यवसायासाठी पैसे मागितले तर त्याला द्यावे का अशा विवंचनेत मुलाचे बाबा असतात. म्हातारपणी केवळ पैसे असून भागत नाही. तर माणसांचा आधार, प्रेम लागते. मग नवी सून आणि जावई ते देईल का, हेही प्रश्न आहेतच. लग्नाआधी आणि नंतर पडणाऱ्या या असंख्य प्रश्नांना ‘अनुरूप’चे गौरी व महेंद्र कानिटकर या कार्यक्रमात उत्तरे देतील.