बालाजी व साईभक्तांसाठी नगरसूल ते चेन्नई दरम्यान लवकरच चेन्नई एक्सप्रेस सुरू होणार असल्याची माहिती खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी दिली.
साईनगर रेल्वेस्थानकावरून चेन्नई एक्सप्रेस सुरू करावी, अशी मागणी प्रवासी संघटनेचे अध्यक्ष रणजित श्रीगोड व आपण रेल्वेमंत्री मल्लिकार्जुन खर्गे व राज्यमंत्री कोटला जयसूर्यप्रकाश रेड्डी यांना भेटून केली होती. आता ही साप्ताहिक रेल्वे गाडी सुरू करण्यात येणार आहे. दर सोमवारी दुपारी १ वाजता नगरसूल रेल्वेस्थानकावरून चेन्नई एक्सप्रेस निघेल. मंगळवारी दुपारी १.३० वाजता ही गाडी रेणीगुंठा तर दुपारी ४.१५ वाजता चेन्नई येथे पोहोचेल. रविवारी ही गाडी चेन्नईहून सुटेल सकाळी ११.४० वाजता ही गाडी रेणीगुंठा येथे येईल. तर सोमवारी ११.५५ वाजता ती नगरसूल रेल्वेस्थानकावर पोहोचेल. औरंगाबाद, नांदेड, निजामाबाद, काचीगुडा, गुट्टी, रेणीगुंठा या ठिकाणी या गाडीला थांबा देण्यात आला आहे. कोपरगाव, शिर्डी व राहाता येथील प्रवासी हे नगरसूल तर श्रीरामपूर, नेवासे, राहुरी व गंगापूर येथील प्रवाशांना औरंगाबाद रेल्वेस्थानकावरून चेन्नई एक्सप्रेसने प्रवास करणे सोयीचे होईल असे खासदार वाकचौरे यांनी सांगितले.
साईनगर ते भुवनेश्वर दरम्यान पुरी साप्ताहिक एक्सप्रेस नुकतीच सुरू करण्यात आली आहे.