प्रादेशिक परिवहन कार्यालयांत कामासाठी येणाऱ्या महिलांच्या अडचणींचा विचार करून परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी एक निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार शिकाऊ परवाना काढतानाच्या चाचणीसाठी महिलांना प्राधान्य देण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे या चाचणीदरम्यान महिलांना एकत्रितपणे बसवून त्यांची वेगळी बॅच तयार करता येईल का, याची चाचपणीही सुरू आहे.

शेअर टॅक्सींमध्ये महिलांची होणारी कुचंबणा लक्षात घेऊन परिवहन विभागाने अशा टॅक्सींमध्ये महिलांसाठी चालकाच्या शेजारील आसन राखीव ठेवण्याचा निर्णय घेतला. त्याच वेळी प्रादेशिक परिवहन कार्यालयात खेटे घालावे लागत असल्याने महिलांना ज्या त्रासाला सामोरे जावे लागते, तो कमी करण्याच्या दृष्टीनेही परिवहन विभागाने उपाययोजना केल्या आहेत.
सध्या शिकाऊ परवान्यासाठी चाचणीची वेळ ऑनलाइन देण्यात येते. या ऑनलाइन पद्धतीमध्ये महिलांसाठी एक पूर्ण बॅच राखीव ठेवता येईल का, याबाबतही चाचपणी सुरू असल्याचे रावते यांनी स्पष्ट केले. साधारणपणे दुपारी दोन ते तीन ही वेळ महिलांसाठी सोयीची असल्याने या वेळेत फक्त महिलांची चाचणी घेण्यात येईल. तसेच इतर बॅचमध्येही पुरुषांबरोबर चाचणी देणाऱ्या महिलांची आसनव्यवस्था एकत्रितपणे करण्यावर भर देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
प्रादेशिक परिवहन कार्यालयांमध्ये महिलांना ताटकळत थांबावे लागू नये, यासाठी आम्ही महिलांची विशेष रांग किंवा खिडकी करण्याऐवजी या पद्धतीवर भर देणार आहोत. ही पद्धत महिलांसाठी सोयीची ठरेल, असा विश्वास परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी व्यक्त केला. यापुढेही महिलांसाठी गोष्टी सोयीच्या कशा करता येतील, याबाबत विचार होणार असल्याचे त्यांनी सांगितले. त्याच दृष्टीने एसटी महामंडळातील बसगाडय़ांमध्ये शालेय मुलींसाठी किंवा महिलांसाठी दरवाजाच्या जवळची आसने राखीव ठेवण्याचा निर्णयही घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.