23 October 2020

News Flash

आषाढीनिमित्त पंढरपूरसाठी प्रथमच खास रेल्वे

आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरला वारक-यांच्या दिंडय़ा निघाल्या आहेत. त्यात आता बसगाडय़ांबरोबर रेल्वेची दिंडीही निघणार आहे.

| July 13, 2013 01:51 am

आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरला वारक-यांच्या दिंडय़ा निघाल्या आहेत. त्यात आता बसगाडय़ांबरोबर रेल्वेची दिंडीही निघणार आहे. मध्य रेल्वेने तीन रेल्वेमार्गावर विशेष गाडय़ा सुरू केल्या असून, नगर जिल्ह्यातील भाविकांना एका गाडीची सुविधा मिळणार आहे.
मध्य रेल्वेने अमरावती ते पंढरपूर या मार्गावर आषाढीसाठी चार दिवस विशेष गाडी सोडण्याचे जाहीर केले आहे. या गाडीला १९ डबे असून १ वातानुकूलित, ४ स्लीपर, १२ सर्वसाधारण डबे जोडण्यात येणार आहे. अमरावती, मूर्तिजापूर, अकोले, शेगाव, भुसावळ, जळगाव, मनमाड, कोपरगाव, बेलापूर, नगर, दौंड, भिगवण, जेऊर, कुर्डूवाडीमार्गे पंढरपूरला ही गाडी जाणार आहे. या गाडय़ांचे आरक्षण सुरू झाले आहे. शनिवार, रविवार, मंगळवार व बुधवारी ही गाडी अमरावती येथून सुटेल तर परतीच्या प्रवासात पंढरपूरहून रविवार, सोमवार, शनिवारी ती सुटेल. त्यामुळे नगर, नाशिक, धुळे, जळगाव व अमरावती जिल्ह्यातील वारक-यांची सोय होणार आहे.
शिर्डी ते पंढरपूर ही गाडी आठवडय़ातून तीन वेळा धावते. शिर्डी येथून रविवार, मंगळवार व गुरुवारी ही गाडी पंढरपूरला जाते. त्याच दिवशी पुन्हा पंढरपूरहन शिर्डीला येते. त्यामुळे आता आषाढी एकादशीच्या कालावधीत नगरच्या भाविकांना पंढरपूरला जाण्याची सोय होणार आहे.
आषाढी एकादशीसाठी पंढरपूरला परिवहन खाते नेहमीच जादा बसगाडय़ा सोडते. पण रेल्वेकडे मागणी करूनही पंढरपूर यात्रेसाठी जादा गाडय़ा सोडल्या जात नव्हत्या. आता रेल्वेने पंढरपूरच्या वारकऱ्यांवरील अन्याय दर केला आहे. दिंडीला जाणा-या भाविकांना परतीचा प्रवास आणखी सुलभ होणार आहे. रेल्वेने औरंगाबाद पंढरपूर या मार्गावर चार गाडय़ा तर लातूर-पंढरपूर या मार्गावर सोळा गाडय़ा अषाढी एकादशीच्या कालावधीत सोडण्याचे जाहीर केले आहे. या गाडय़ांचे आरक्षण शनिवार दि.१३ पासून सुरू होणार आहे. औरंगाबाद-पंढरपूर गाडी जालना, परतूर, सेलू, मानवत, परभणी, गंगाखेड, परळी वैजनाथ, लातूर, बार्शी, कुर्डवाडी या मार्गे तर लातूर पंढरपूर ही विशेष गाडी लातूर, औसा, मुखेड, ढोकी, कळंब, उस्मानाबाद, बार्शी, कुडरुवाडी या मार्गे धावणार आहे.
शिर्डी-पंढरपूर ही रेल्वे आठवडय़ातून तीन दिवस धावते. ती दररोज सुरू करावी, अशी मागणी प्रवासी संघटनेचे अध्यक्ष रणजित श्रीगोड यांनी रेल्वेमंत्री मल्लिकार्जुन खर्गे यांची भेट घेऊन केली. मराठवाडय़ाला रेल्वेने आषाढी एकादशीनिमित्त प्रवाशांना विशेष न्याय दिला. पण आता खान्देश, विदर्भ व नगर, नाशिकलाही न्याय द्यावा, एकादशीच्या कालावधीत या मार्गावर दररोज गाडय़ा सोडाव्या अशी मागणी श्रीगोड यांनी केली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 13, 2013 1:51 am

Web Title: special train to pandharpur ashadhi wari from nagar
टॅग Special Train
Next Stories
1 शेंडापार्कला १०० खाटांचे ग्रामीण रुग्णालय, फॉरेन्सिक लॅब सुरू होणार
2 टेम्पोच्या धडकेने कामगार ठार
3 तीन मजुरांवर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार
Just Now!
X