वाढत्या तंत्रज्ञानाचा वापर त्यातील खाचखळगे लक्षात घेऊन झाला पाहिजे. तंत्रज्ञानाच्या अवास्तव वापरामुळे माणूस शांतता हरवत आहे, अशी खंत व्यक्त करतानाच सोशन नेटवर्किंगच्या नावाखाली समाजरचना वेगळय़ा दिशेला वाटचाल करीत आहे. यावर लक्ष ठेवण्यासाठी स्वतंत्र नियामक मंडळ निर्माण होण्याची गरज लेखक अतुल कहाते यांनी व्यक्त केली.
अंबाजोगाई येथे वसुंधरा सेवा प्रतिष्ठानच्या डॉ. विमल मुंदडा स्मृती व्याख्यानमालेत ‘तंत्रज्ञानाची प्रगती व वाढते मायाजाल’ या विषयावर कहाते यांचे व्याख्यान झाले. अॅड. मीर फरकुंद अली, डॉ. दिलीप खेडगीकर, पांडुरंग सोनेसांगवीकर, सूर्यभान बगाटे आदी या वेळी उपस्थित होते. कहाते म्हणाले, की आधुनिक तंत्रज्ञानाच्या वाढत्या प्रसारामुळे हे तंत्रज्ञान माणसाला कोठे घेऊन जात आहे, याचे भान राहिले नाही. अलीकडे फेसबुक व ट्विटरच्या अवाढव्य, अवास्तव वापरामुळे माणूस एकमेकांचा प्रत्यक्ष संवाद विसरला. जगात ८० ते ९० कोटी लोक फेसबुक वापरतात. त्यात अनेकजण रात्रंदिवस फेसबुकवर बसलेले असतात. हा प्रश्न गंभीर बनत चालला आहे. यात युवकांचे प्रमाण मोठे आहे. त्यामुळे युवक वाचन विसरला आहे. माणसाला नावीन्याचे आकर्षण असल्याने फेसबुकवरच्या अपडेट्स सतत बघण्याची सवय युवकांना जडली आहे. त्यामुळे पालकांनी पाल्याच्या बाबतीत तंत्रज्ञानाच्या वापराबद्दल दक्ष राहिले पाहिजे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. इंटरनेट व फेसबुकचा उगम कसा झाला याचा इतिहास कहाते यांनी सांगितला. या वेळी प्रेक्षक मोठय़ा संख्येने उपस्थित होते.