मोरा ते मुंबई दरम्यान दररोज प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या सात ते आठ हजार असून प्रवाशांसाठी उरण (मोरा) ते मुंबई भाऊचा धक्का दरम्यानच्या जलप्रवासात सुधारणा करून या मार्गावरून स्पीड बोटी सुरू करण्याची परवानगी महाराष्ट्र मेरिटाइम बोर्डाने आठ महिन्यांपूर्वी दिली होती. अकरा महिन्यांच्या प्रायोगिक तत्त्वावर देण्यात आलेली परवानगी संपत आली असल्याने मोरा-मुंबई स्पीड बोटीचा सेवा मुहूर्त कधी सापडेल, असा सवाल प्रवाशांकडून केला जात आहे.
येथील जुन्या झालेल्या बोटी, डिझेलचे वाढते दर, भरती-ओहोटीच्या दरम्यान चॅनलमधील गाळामुळे प्रवाशांना होणारा त्रास सहन करीत प्रवास करावा लागत आहे. त्याचप्रमाणे अवघ्या ४५ मिनिटांचे असलेले अंतर पार करण्यासाठी सव्वा तास लागतो. त्यामुळे दरवर्षी वाढत्या तिकीट दरामुळे वेळ आणि पैसाही अधिक द्यावा लागत आहे. त्यामुळे मोरा ते मुंबई दरम्यान स्पीड बोट सुरू करण्याची मागणी प्रवाशांकडून करण्यात आली होती. या जलवाहतुकीमुळे प्रवाशांना कमी वेळात मुंबई गाठता येणार असल्याने तसेच नियमित बोटींच्या मानाने केवळ दहा रुपयेच अधिक मोजावे लागणार असल्याने ही सेवा लवकर सुरू करण्याची मागणी प्रवाशांनी केली आहे.  महाराष्ट्र मेरिटाइम बोर्डाने परवानगी दिली असल्याची माहिती मोरा पोर्ट अधिकारी नितीन कोळी यांनी दिली आहे. ही सेवा येत्या पंधरा दिवसांत सुरळीत सुरू करू, असे मत आर. एन. शिपिंगचे भागीदार राजेश बुरांडे यांनी व्यक्त केले आहे.