रस्त्यावरील वाहनांचा वेग कमी होऊन अपघात टाळता यावेत याकरीत रस्तात अनेक ठिकाणी गतिरोधक बनविले जातात,मात्र उरण-पनवेल रस्त्यावरील अनेक गतिरोधकांवर गतिरोध असल्याच्या मार्गदर्शक फलकांचा तसेच पांढऱ्या पट्टयांचा अभाव असल्याने गतिरोधकामुळे अनेक अपघात होत आहेत. याकडे सार्वजनिक बांधकाम खाते, रस्ते विकास प्राधिकरण तसेच वाहतुक विभागाचेही दुर्लक्ष होत असल्याच्या तक्रारी प्रवाशांकडून केल्या जात आहेत.
वाहनांची वाढती संख्या व त्यामुळे होणारे अपघात तसेच रस्ता ओलांडण्यासाठी वाहनांचा वेग कमी व्हावा याकरीता उरण -पनवेल राज्य महामार्ग क्रमांक ५४ वर अनेक ठिकाणी गतिरोधक तयार करण्यात आलेले आहेत. गतिरोधक असलेल्या ठिकाणी पुढे गतिरोधक आहे. असा फलक लावण्याची गरज असतांनाही सार्वजनिक बांधकाम खाते, रस्ते विकास प्राधिकरण किंवा इतर विभागाने असे फलक लावलेलेच नसल्याने शनिवारी एकाच दिवशी गतिरोधामुळे चार अपघात घडल्याची घटना घडली आहे.  यापकी जासई (दास्तान) येथील गतिरोधकामुळे अपघात झालेल्या दोन मोटर सायकलस्वार तरुण बेशुध्द अवस्थेत असून त्यांच्यावर पनवेल येथील रूग्णालयात उपचार सुरू आहेत. नवघर येथे एका मोटार सायकलस्वारांचे हात निकामी होण्याची वेळ आलेली आहे. रस्त्यातील गतिरोधक जवळ येई पर्यंत लक्षात न आल्याने फुंडे येथील मोटार सायकलस्वार तसेच बोकडविरा येथील मोटार सायकलस्वार जखमी झाले आहेत.
गतिरोधक तयार केल्यानंतर त्यांच्यावर पांढरे पट्टे न मारल्याने अनेकांना याची माहीती नसते, यापकी अनेक गतिरोधक तर काही तासातच तयार झालेले असतात, त्यामुळे नेहमीच्या रस्त्याने सकाळी गेलेल्या वाहनचालक रात्री परततो तेव्हा त्याला या गतिरोधकाचा फटका बसतो, त्यामुळे वाहतुक विभाग तसेच रस्त्याची जबाबदारी असलेल्या विभागांनी रस्त्यावर गतिरोधक बनवितांना सुरक्षेचे नियम म्हणून दक्षता घेण्याची मागणी जनतेकडून केली जात आहे.