02 March 2021

News Flash

गाळउपशाला वेग, उत्पादकता वाढणार!

दुष्काळामुळे कोरडय़ाठाक पडलेल्या धरणांमधून आतापर्यंत तब्बल १६६ लाख ४३ हजार ब्रास गाळउपसा करण्यात आला. पहिल्या टप्प्यात राबविलेल्या उपक्रमात बीड जिल्ह्य़ाने आघाडी घेतली. आता जायकवाडीतील गाळ

| May 10, 2013 01:15 am

दुष्काळामुळे कोरडय़ाठाक पडलेल्या धरणांमधून आतापर्यंत तब्बल १६६ लाख ४३ हजार ब्रास गाळउपसा करण्यात आला. पहिल्या टप्प्यात राबविलेल्या उपक्रमात बीड जिल्ह्य़ाने आघाडी घेतली. आता जायकवाडीतील गाळ उपसण्याचे काम वेगात सुरू आहे. धरणाच्या गाळात मातीचे प्रमाण २३.७४ टक्के, तर वाळू ५.९ ते ४६ टक्के असते. गाळ शेतात टाकल्यास मातीची पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढल्याने पीक उत्पादकता वाढू शकते. धरणातील पाणीसाठाही वाढण्यास मदत होणार असल्याने दुष्काळात गाळ काढण्याचे काम वेगात सुरू आहे. विशेष म्हणजे या उपक्रमात लोकसहभाग अधिक असल्याने प्रशासनाकडूनही त्यास सर्व प्रकारचे सहकार्य दिले जात आहे.
धरणांच्या क्षमतेत थोडी का असेना वाढ व्हावी, या उद्देशाने बीड जिल्ह्य़ात हा उपक्रम प्रथम सुरू करण्यात आला. बीड जिल्हय़ातील आष्टी, पाटोदा भागात धरणातील गाळ शेतात नेणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या मोठी होती. मात्र, ही योजना काही श्रीमंत शेतकऱ्यांसाठीच आहे, असा समज होता. गाळ काढून नेल्यास रॉयल्टी भरावी लागते, असे वाटल्याने काढलेला गाळ नेण्यास शेतकरी तयार नव्हते. जिल्हाधिकारी सुनील केंद्रेकर यांनी या साठी विशेष प्रयत्न केले.
पहिल्या टप्प्यात श्रीमंत शेतकऱ्यांनी काढलेला गाळ नेण्यास सुरुवात केली. मात्र, ज्या कोरडवाहू शेतकऱ्याची जमीन तुलनेने हलकी आहे, त्याला गाळ नेता येत नव्हता. या साठी बँकांच्या अधिकाऱ्यांसमवेत जिल्हाधिकारी केंद्रेकर यांनी बैठक घेतली. त्यानंतर काही बँकांच्या अधिकाऱ्यांनी गाळ काढून नेणाऱ्या शेतकऱ्यांना कर्ज मंजूर करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे दुष्काळी आष्टी, पाटोदा तालुक्यांत हलकी जमीन असणाऱ्या शेतकऱ्यांनी गाळ नेण्यास प्रारंभ केला. या उपक्रमामुळे धरणांची क्षमता वाढू शकेल, असा विश्वास निर्माण झाल्यानंतर इतर जिल्ह्यांत या उपक्रमास सुरुवात करण्यात आली.
उस्मानाबाद जिल्हय़ातही शेतकऱ्यांनी चांगला प्रतिसाद दिला. या उपक्रमास सरकारकडून निधी मिळावा, अशी मागणी पुढे आली. मुख्यमंत्र्यांच्या उस्मानाबाद भेटीदरम्यान या उपक्रमास सरकारने आर्थिक मदत करावी, अशी विनंती करण्यात आली. मात्र, सरकारी निधी मिळाल्यास त्याचे नवेच गुंते तयार होतील, असेही अधिकाऱ्यांनी सांगितले. मात्र, गाळ काढण्याच्या उपक्रमास अधिक वेग देण्यासाठी प्रशासनाने खास लक्ष निघाल्याने मोठय़ा प्रमाणात गाळउपसा झाला.
जायकवाडीतून गाळउपसा करणे मात्र तुलनेने अवघड काम होते. त्यामुळे विभागीय आयुक्त संजीव जैस्वाल यांच्या अध्यक्षतेखाली सिंचन विभागातील अधिकाऱ्यांची बैठक घेतल्यानंतर गाळ काढण्याची प्रक्रिया हाती घेण्यात आली. मराठवाडा कृषी विद्यापीठात विस्तार कृषी विद्यावेत्ता म्हणून करणारे प्रा. ए. व्ही. गुट्टे म्हणाले, की धरणातील गाळात पिकांना आवश्यक असणारे रासायनिक गुणधर्मही अधिक आहेत. गाळामध्ये ‘पीएच’चे (जमिनीचा सामु) प्रमाण ७.२ ते ७.८ टक्के असते, सेंद्रिय कर्ब ०.३ ते ०.७ व चुनखडीचे प्रमाण १५ ते १९ टक्के असते.’ या दुष्काळात गाळ काढण्याचा हा उपक्रम लोकसहभागामुळे यशस्वी ठरला. आतापर्यंत काढल्या गेलेल्या गाळाची जिल्हानिहाय आकडेवारी पुढीलप्रमाणे, (सर्व आकडे लाखात व ब्रासमध्ये) औरंगाबाद ४.१५, जालना ३.७४, परभणी २.१२, हिंगोली १.३७, नांदेड ४.०४, बीड ८.८४, लातूर ३८.१८, उस्मानाबाद २६.०२.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 10, 2013 1:15 am

Web Title: speedup to detritus uplift productivity will increase
टॅग : Dam
Next Stories
1 पिनाक अकादमीला अनुदान
2 जिल्हा औषध विक्रेत्यांचा आज ‘बंद’मध्ये सहभाग
3 नांदेडला आज ‘एनए’ अदालत
Just Now!
X