राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका गटाने शहरातील अवैध धंदे बंद करण्यासाठी केलेले भजन, कीर्तन आंदोलन गाजत असतानाच पक्षाच्या काही पदाधिकाऱ्यांनी फक्त प्रसिद्धीच्या झोतात येण्यासाठी केलेला हा निष्फळ प्रयत्न होता, अशी टीका केल्याने या आंदोलनावरून पक्षातच दोन गट पडल्याचे दिसून येत आहे.
महानगर राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी अध्यक्ष विनोद देशमुख यांनी त्यांच्या समर्थक काही मोजक्या पदाधिकाऱ्यांसह अवैध धंदे बंद करण्याच्या मागणीसाठी औद्योगिक वसाहत पोलीस ठाण्यासमोर आंदोलन केले. विनोद देशमुख यांच्यासह राष्ट्रवादीचे कार्यकर्ते मृदुंग व झांज हाती घेऊन पोलीस ठाण्यासमोर आले. भजन व कीर्तन म्हणत त्यांनी अवैध धंद्यांविरुद्ध गांधीगिरी पद्धतीने आंदोलन छेडले. सुमारे दोन तास चाललेल्या या आंदोलनाची सांगता पोलीस उपअधीक्षक पंढरीनाथ पवार यांच्या मध्यस्थीनंतर झाली. हे आंदोलन शहरात चांगलेच गाजू लागले आहे. महानगर अध्यक्षपदावरून हटविण्यात आल्यानंतर प्रदेश कार्यकारिणीत देशमुख यांना स्थान देण्यात आले. कोणत्या ना कोणत्या कारणाने आपणास प्रसिद्धी मिळावी या उद्देशातून त्यांनी निष्फळ आंदोलन केले, अशी टीका राष्ट्रवादीच्या एका पदाधिकाऱ्याने केली आहे.
जळगाव जिल्ह्यात अवैध धंदे प्रचंड प्रमाणात सुरू आहेत. त्याविरोधात विरोधी पक्षांनी आंदोलन करणे योग्य ठरते. मुक्ताईनगर येथे गेल्याच महिन्यात शिवसेनेने अवैध धंद्यांविरोधात पोलीस ठाण्यासमोरच सट्टा, पत्ता खेलो आंदोलन केले होते, ते दखल घेण्याजोगे होते. विरोधी पक्षाची भूमिका येथे शिवसेनेने बजावली होती. जळगावातील राष्ट्रवादीचे आंदोलन म्हणजे सत्ताधाऱ्यांना स्वपक्षाच्या लोकांनीच दिलेला घरचा आहेर मानला जात आहे. राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादीची सत्ता असताना आणि गृहमंत्रीपद राष्ट्रवादीकडे असताना त्याच पक्षाचे पदाधिकारी रस्त्यावर उतरतात ही बाब खटकणारी असल्याने दुसऱ्या गटाने देशमुखांविरुद्ध बोलणे सुरू केले आहे. गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी अवैध धंद्यांविरुद्ध नेहमीच इशारे दिलेले आहेत. ज्या पोलीस ठाण्याच्या परिसरात अवैध धंदे सुरू असतील तेथील अधिकाऱ्यांवरच कारवाईचा बडगा उगारला जाईल, असा इशारा त्यांनी अनेकदा दिला असताना जिल्ह्यातील पोलीस   अधीक्षकापासून   उपनिरीक्षकापर्यंत कोणताच पोलीस  अधिकारी   हा  इशारा जुमानत नसल्याचे दिसत आहे.
पालकमंत्री गुलाब देवकर हे जिल्ह्यातील अवैध धंद्यांविषयी जाणून आहेत. परंतु तेही याप्रकरणी गप्प आहेत. विनोद देशमुख यांची महानगर अध्यक्ष पदावरून प्रदेश समितीत वर्णी लागली. ती त्यांना बढती देण्यात आली असे दिसत असले तरी त्यांच्या अकार्यक्षमतेमुळे त्यांची उचलबांगडी करण्यात आल्याची चर्चा आहे. देशमुखांनी जिल्हा अध्यक्ष, पालकमंत्री, महानगर अध्यक्ष  यांना विश्वासात न घेता, त्यांच्याशी चर्चा न करता किंवा त्यांचा पाठिंबा न घेता आंदोलन केल्याने त्यांच्यावर पक्षातूनच टीका होऊ लागली आहे.