26 May 2020

News Flash

अपूर्व विज्ञान प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद

उत्तर अंबाझरी मार्गावरील राष्ट्रभाषा भवनात अपूर्व विज्ञान प्रदर्शन आयोजित करण्यात आले असून त्यात शहरातील १५ शाळांतील विद्यार्थ्यांनी विविध प्रयोग सादर केले आहे

| November 20, 2014 08:42 am

उत्तर अंबाझरी मार्गावरील राष्ट्रभाषा भवनात अपूर्व विज्ञान प्रदर्शन आयोजित करण्यात आले असून त्यात शहरातील १५ शाळांतील विद्यार्थ्यांनी विविध प्रयोग सादर केले आहे. प्रदर्शन बघण्यासाठी शाळेतील विद्यार्थ्यांसह पालक उत्स्फूर्त प्रतिसाद देत आहे. नागपूर महापालिका आणि असोसिएशन फॉर रिसर्च अ‍ॅन्ड ट्रेनिंग इन बेसिक सायन्स एज्युकेशन, नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले.
या विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन महापौर प्रवीण दटके यांच्या हस्ते बुधवारी सकाळी पार पडले. याप्रसंगी उपमहापौर मुन्ना पोकुलवार, महापालिकेच्या शिक्षण सभापती चेतना टांक, माजी उपमहापौर सुनील अग्रवाल, रमेश सिंगारे प्रामुख्याने उपस्थित होते. २३ नोव्हेंबपर्यंत सुरू राहणाऱ्या या प्रदर्शनात शहरातील १५ शाळांतील विद्यार्थ्यांनी १०० हून अधिक प्रयोग सादर करून आपल्या कल्पकतेचा परिचय करून दिला आहे. बॅरिस्ट्रर शेषराव वानखेडे विद्यानिकेतनमधील इयत्ता नववीतील विद्यार्थीनी पूजा मेश्राम हिने पृथ्वी सूर्याभोवती फिरताना तिच्या अक्षाची दिशा बदलत नाही, तर इयत्ता आठवीत शिकणाऱ्या अक्षय प्रभाकर लोखंडे याने ‘कॅन्डल इन बोतल’ हा प्रयोग सादर केला. वाल्मिकीनगरातील हिंदी माध्यमिक शाळेतील इयत्ता नववीची विद्यार्थीनी तनुजा झा हिने ‘व्हॅक्युम लिफ्ट’ तर आकाश पटेल या विद्यार्थ्यांने डबल पुलिंग हा प्रयोग सादर केला. टेलिफोन एक्सचेंज चौकातील डॉ. राममनोहर लोहिया विद्यालयातील आठवीत शिकणाऱ्या निखील फनिभरे याने मेजिक बॉक्स, गांधीबागेतील पन्नालाल देवडीया हायस्कूलमधील इयत्ता नववीत शिकणाऱ्या नितीन मरसकोल्हे आणि शेख मुजफर शेख याने ‘पेंडूलम’ हा प्रयोग सादर करून वेगामुळे काय होते याची माहिती उलगडून सांगितली.
सुरेंद्रगड हिंदी हायस्कूलमधील नववीत शिकणाऱ्या अभिषेक दुबे याने ‘पेपर बॅक’ हा प्रयोग सादर केला. हवेचा दाब देऊन वजनी वस्तू कशी उचलल्या जाते, याचे त्याने प्रात्याक्षिक करून दाखवले. विज्ञान विषयाच्या शिक्षिका दिप्ती बिस्ट यांच्या मार्गदर्शनातून हा प्रयोग सादर करण्यात आल्याचे त्याने सांगितले. संजयनगर हिंदी माध्यमिक शाळेतील इयत्ता नववीत शिकणाऱ्या हेमंत प्रेमलाल साहू याने आपल्या शरिरातील ‘हृदय’ कसे कार्य करते, याचा प्रयोग सादर केला आहे.
प्रदर्शन बघण्यासाठी कोलकाता येथून समर बागची, डॉ. वीरेन दास, प्रा. कृष्णेंद्र चक्रवर्ती हे तिघे जण आले आहेत. प. बंगालमध्ये असे प्रदर्शन आयोजित करण्यात येत नाही. ज्या काही प्रदर्शन होतात, त्या वैयक्तिक शाळास्तरावर होतात. अशी सामूहिक प्रदर्शन आयोजित व्हावे, यासाठी आम्ही प्रयत्नशील राहणार असल्याचे कृष्णेंद्र चक्रवर्ती यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना सांगितले. या प्रदर्शनाचे मुख्य आयोजक सुरेश अग्रवाल म्हणाले. विद्यार्थ्यांच्या मनात विज्ञानाविषयी गोडी निर्माण व्हावी, या उद्देशाने गेल्या सोळा वर्षांंपासून हे प्रदर्शन आयोजित करण्यात येत आहे. हे सतरावे प्रदर्शन होय. या प्रदर्शनासाठी महापालिका आणि जिल्हा परिषदेच्या सर्वच शाळांना आमंत्रित करण्यात आले आहे. आज पहिल्या दिवशी महापालिकेच्या पंधरा शाळांनी प्रयोग सादर केले आहेत. उद्या, गुरुवारपासून आणखी शाळा सहभागी होतील, तसेच या प्रदर्शनाला आणखी प्रतिसाद मिळेल, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
गेल्यावर्षीप्रमाणे याहीवर्षी प्रदर्शनामध्ये भोपाल येथील एकलव्य प्रकाशनाच्या पुस्तकाचे स्टॉल लागले आहे. या स्टॉलमध्ये सर्वच प्रकारचे पुस्तके उपलब्ध आहेत. प्रदर्शन बघण्यासाठी येणारे विद्यार्थी व त्यांच्या पालकांनी किमान एकतरी पुस्तक खरेदी करावे, अशी अपेक्षा स्टॉलच्या संचालिका अर्चना रस्तोगी यांनी व्यक्त केली. हे प्रदर्शन यशस्वी करण्यासाठी रघु ठाकूर, राजाराम शुक्ला, प्रकाश गावंडे, विनय दास आदी पदाधिकारी प्रयत्नशील आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 20, 2014 8:42 am

Web Title: spontaneous response to science exhibition
टॅग Loksatta,Nagpur
Next Stories
1 लाखभर नागरिकांची ‘सारथी’ला भेट
2 शेतीच्या विकासासाठी १३ हजार शेतकऱ्यांना प्रशिक्षण
3 वारसा उरला केवळ नावापुरता
Just Now!
X