ठाणे महापालिकेतील अधिकारी-कर्मचारी, नगरसेवक तसेच बडय़ा पदाधिकाऱ्यांपुरताच वापर असणाऱ्या कोरम मॉलजवळील शहीद हेमंद करकरे क्रीडा संकुलात सर्वसामान्य ठाणेकरांनाही प्रवेश दिला जाईल, हे प्रशासन आणि ठाण्यातील बडय़ा नेत्यांचे आश्वासन केवळ फुकाची बडबड ठरली असून, या संकुलाचे दरवाजे अजूनही ठाणेकरांसाठी बंदच असल्याची माहिती पुढे येऊ लागली आहे. या संकुलातील शहीद तुकाराम ओंबळे बॅटमिंटन तसेच लॉनटेनिस कोर्टचा वापर करण्यासाठी ठाणेकरांना ठरावीक शुल्क आकारण्याचा विचार मध्यंतरी सुरू झाला होता. यासंबंधीची नियमावलीही केली जाणार होती. ठाण्याचे महापौर, उपमहापौरांसह वरिष्ठ अधिकाऱ्यांसाठी खुले असणाऱ्या या संकुलात इतर वेळी सर्वसामान्य ठाणेकरांनाही प्रवेश दिला जावा, असा प्रस्ताव ठाण्यातील सत्ताधारी शिवसेनेचे सर्वेसर्वा आमदार एकनाथ िशदे यांनीच तीन वर्षांपूर्वी मांडला होता. असे असताना प्रत्यक्ष शुभारंभ होऊन तीन वर्षांचा कालावधी उलटूनही अद्याप तसे झालेले नाही आणि शिंदे यांच्या महापालिकेतील नगरसेवकांनाही त्याविषयी काही पडलेले नाही.  
ठाणे महापालिकेने एका खासगी विकासकाच्या माध्यमातून कोरम मॉलजवळ उभारलेल्या या क्रीडा संकुलाचा वापर गेल्या तीन वर्षांपासून सुरू आहे. शहरातील काही राजकीय पदाधिकारी आपल्या स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातून या संकुलावर ताबा मिळविण्याच्या प्रयत्नात असताना माजी आयुक्त आर. ए. राजीव यांनी मोठय़ा कुशलपणे हा डाव हाणून पाडला. त्यामुळे हे संकुल केवळ महापालिकेच्या अखत्यारीत राहील, असा ठराव त्यांनी मंजूर करून घेतला. हा ठराव मंजूर करताना याठिकाणी अधिकारी-कर्मचारी, नगरसेवक आणि बडय़ा पदाधिकाऱ्यांना प्रवेश असेल, असेही ठरले. शहीद हेमंत करकरे यांच्या नावाने उभारण्यात आलेल्या या संकुलात शहीद तुकाराम ओंबळे यांच्या नावाने बॅटिमटन कोर्ट उभारण्यात आले आहे. याशिवाय लॉनटेनिस कोर्ट आणि अद्ययावत असा जॉगिंग ट्रॅक हे या संकुलाचे वैशिष्टय़ आहे. असे आधुनिक क्रीडा संकुल ठाणे महापालिकेच्या मालकीचे असणे भूषणावह असले तरी सर्वसामान्यांना येथे प्रवेश नसल्यामुळे ठाणेकरांमधून नाराजीचा सूर व्यक्त होत आहे.
प्रवेशाचे आश्वासन हवेतच
या ठिकाणी ठरावीक अधिकारी आणि नगरसेवक दररोज सकाळी येतात आणि तेथील सुविधांचा वापर करतात. मोठय़ा विकासकाकडून मिळविलेल्या या संकुलात सर्वसामान्य ठाणेकरांना प्रवेशबंदी कशासाठी, असा सवाल सातत्याने पुढे येऊ लागल्यामुळे महापालिका निवडणुकांच्या तोंडावर शिवसेनेने या संकुलाचा शुभारंभ सोहळा मोठय़ा थाटामाटात उरकताना या संकुलात सर्वसामान्यांना प्रवेश दिला जावा, असा प्रस्ताव पुढे आणला. निवडणुका समोर असताना मतदारांचा रोष नको, अशी खेळी यामागे होती. दिवसा आणि सायंकाळी मोक्याच्या वेळेत सर्वसामान्यांना प्रवेश देता आला नाही, तरी सकाळी दहा ते पाच या कामाच्या वेळेत तरी सर्वासाठी हे संकुल खुले राहावे, असा प्रस्ताव खुद्द एकनाथ िशदे यांनी मांडला. त्यासाठी राजीव यांना गळही घालण्यात आली, मात्र राजीव यांची बदली होताच शिवसेना नेत्यांना ठाणेकरांना दिलेल्या या वचनाचा विसर पडला असून, अजूनही या संकुलात सर्वसामान्यांना प्रवेश बंदी असल्याचे चित्र दिसत आहे. मुळात सकाळी दहा ते सायंकाळी पाच ही वेळ सर्वसामान्यांसाठी सोयीची नाही. असे असताना शुभारंभ होऊन तीन वर्षे उलटूनही संकुलाचे दरवाजे सर्वसामान्यांना खुले करण्याचे कोणतेही ठोस प्रयत्न अद्याप झाले नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
क्रीडा धोरणात समावेश
यासंबंधी ठाणे महापालिकेचे जनसंपर्क अधिकारी संदीप माळवी यांच्याकडे विचारणा केली असता त्यांनी सर्वसामान्यांना अजूनही या संकुलात प्रवेश नसल्याचे मान्य केले. तरीही जुना प्रस्ताव अद्याप विचाराधीन असून यासंबंधीची ठोस नियमावली तयार केली जात असल्याचे त्यांनी सांगितले. ठाणे महापालिकेने स्वतंत्र असे क्रीडा धोरण आखले असून, त्यामध्ये हेमंत करकरे क्रीडा संकुलातील प्रवेशाचा अंतर्भाव केला गेला आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.