वीस तासांत सहाशेपन्नास फुट लांब कागदी पट्टीवर व्यंगचित्रांची शृंखला काढून जागतिक विक्रम तडीस नेण्याचा यशस्वी प्रयत्न व्यंगचित्रकार सुहास पालीमकर यांनी केला. विक्रमाची सत्यता पडताळल्यानंतर याची जागतिक स्तरावरील गिनीज बुकमध्ये नोंद होणार आहे.
    बीड येथील व्यंगचित्रकार सुहास पालीमकर यांनी व्यंगचित्रात जागतिक विक्रम करण्याचा निश्चय करून गुरुवार, १७ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ८ वाजता जिल्हा क्रीडासंकुलाच्या सभागृहात ६५० फुट लांबीच्या कागदी पट्टीवर व्यंगचित्र काढण्यास सुरुवात केली. इन कॅमेरा या विक्रमाला सुरुवात झाली. विविध प्रकारची सलग व्यंगचित्रे काढत शुक्रवारी दुपारी १२ वाजून १७ मिनिटाने ५३३ फुट व्यंगचित्रे काढून जागतिक स्तरावरील पहिला पाँडेचेरी येथील अण्णा मलाई यांचा विक्रम मोडून काढला. त्यानंतर पुढील वेळेत ६५० फुटांची व्यंगचित्रांची शृंखला काढून नवा विक्रम नोंदवला आहे. यावेळी जागतिक गिनीज बुकमध्ये नोंद करण्यासाठी परीक्षकांची टीम उपस्थित होती. या टीमचे प्रमुख रवी कोंका यांनी सांगितले, व्यंगचित्राच्या ट्रीपचे फुटेज, अभिप्राय, समितीचा अहवाल लंडन येथे पाठवल्यानंतर विश्वविक्रमाची नोंद होईल. या प्रक्रियेला महिनाभराचा कालावधी लागेल. पालीमकरांनी व्यंगचित्रात आपले नाव जागतिक स्तरावर नोंदवण्याचा यशस्वी प्रयत्न केला आहे. त्यांच्या या प्रयत्नाला पालकमंत्री जयदत्त क्षीरसागर, नगराध्यक्षा डॉ. दीपा क्षीरसागर यांच्यासह विविध स्तरातील मान्यवरांनी भेटून शुभेच्छा दिल्या.