अनेक शाळेतील विद्यार्थ्यांना प्रवेशपत्रच प्राप्त झाले नाहीत. त्यामुळे या विद्यार्थ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. दुसरीकडे प्रवेशपत्र देण्यासाठी या विद्यार्थ्यांकडून पैसे उकळले जात असल्याचा प्रकारही उघडकीस येत आहे.
शुक्रवारपासून प्रवेशपत्र वाटप करण्यात येणार असल्याने विद्यार्थी संबंधित शाळेत गेले, पण अजूनही बऱ्याच विद्यार्थ्यांना प्रवेशपत्र मिळालेले नाहीत. जुनी मंगळवारी येथील हिंदूस्थान शाळेतील मुख्याध्यापिकेने विद्यार्थ्यांना दोनशे रुपयाची मागणी केली. ज्या विद्यार्थ्यांनी पैसे दिले, त्यांनाच प्रवेशपत्रे वाटप करण्यात आली. ही माहिती मिळताच सामाजिक कार्यकर्ते राहुल बाबुराव मोरे (२९), रा. हिवरीनगर त्या शाळेत गेले. शाळेच्या मुख्य दाराजवळ त्यांना ३० मुले-मुली दिसून आली. त्यांना विचारणा केली असता मुख्याध्यापिकेने प्रत्येकाकडून दोनशे रुपये घेतल्याचे सांगितले.
मोरे यांनी मुख्याध्यापिका एस. एस. पाठक यांना याबाबत विचारणा केली असता त्यांनी प्रवेशपत्रासाठी प्रत्येक विद्यार्थ्यांकडून दोनशे रुपये घेण्यात आले, परंतु त्याची पावती देण्यात येत नसल्याचे सांगितले. यानंतर मोरे यांनी लकडगंज पोलीस ठाणे गाठून तक्रार केली. शिक्षणाचा अधिकार कायद्यान्वये, या मुख्याध्यापिकेवर कारवाई करावी, असे त्यांनी तक्रारीत म्हटले आहे. दरम्यान, याबाबत चौकशीअंती गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचे लकडगंज पोलिसांनी सांगितले.
या घटनेने शैक्षणिक वर्तुळात खळबळ उडाली असून असा प्रकार अन्य शाळेत झाल्याची शक्यता नाकारता येत नाही. शालेय विभागाने दोन वर्षांपासून प्रवेशपत्र तयार करण्याचे कंत्राट एका खासगी कंपनीला दिले आहे. यावर्षी प्रवेशपत्र तयार करणाऱ्या यंत्रामध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने दहावीची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांच्या प्रवेशपत्रात अनेक चुका झाल्यात. काही प्रवेशपत्रात विद्यार्थ्यांचे नाव चुकीचे तर काहींमध्ये नाव दुसऱ्याचे तर छायाचित्र तिसऱ्याचे असे प्रकार झाले. त्यामुळे सर्वच प्रवेशपत्र रद्द करून नवीन प्रवेशपत्र तयार करण्याचे काम सुरू करण्यात आले.
दरम्यान, मंडळाने प्रवेशपत्र २६ फेब्रुवारीलाच संबंधित शाळेत पाठवल्याची माहिती सूत्राकडून कळली. २७ तारखेला सुटी असल्याने त्याचे वाटप होऊ शकले नाही. शुक्रवारपासून त्याचे वाटप करणे सुरू झाले असले तरी अनेक विद्यार्थ्यांच्या हाती अजूनही प्रवेशपत्र पडले नाहीत. तर काही शाळेने पैशासाठी प्रवेशपत्र अडवून ठेवले आहेत.
 वास्तविक परीक्षेच्या आठ दिवसांपूर्वीच प्रत्येक विद्यार्थ्यांच्या हाती प्रवेशपत्र पडणे आवश्यक आहे. परंतु त्याची काळजी मंडळाने घेतल्याचे दिसून येत नाही. त्याचा फटका मात्र विद्यार्थ्यांना बसत आहेत.