दहावी निकालात नामवंत शाळांचा लौकिक कायम
दहावीच्या निकालात शहरासह ग्रामीण भागातील काही नामवंत शाळांनी शंभर टक्के निकालाची परंपरा कायम राखली असताना यंदा अनेक विद्यालयांच्या निकालात चांगली वाढ झाली आहे. विशेष गुणवत्ता मिळविणाऱ्यांमध्ये मुलींनी मुलांवर मात केली आहे.

‘रंगुबाई जुन्नरे’ मध्ये साईप्रसाद उगले प्रथम
नाशिक एज्युकेशन सोसायटी संचलित श्रीमती रंगुबाई जुन्नरे इंग्लिश मीडियम स्कुलने उज्ज्वल यशाची परंपरा कायम राखत शालांत परीक्षेत १०० टक्के निकालाचा मान मिळवला. साईप्रसाद उगले ९६.६० टक्के गुण मिळवत शाळेत प्रथम तर, रश्मी माळी (९५.६०) द्वितीय, सुशांत पवार (९५.४०) तृतीय आले. शाळेतर्फे एकूण २५० विद्यार्थी परीक्षेस बसले होते. एकूण ५० विद्यार्थ्यांनी ९० टक्क्यांपेक्षा अधिक गुण प्राप्त केले. शाळेत शिक्षकांनी करून घेतलेल्या तयारीमुळेच एवढे घवघवीत यश मिळविल्याची प्रतिक्रिया विद्यार्थ्यांनी व्यक्त केली.

‘होरायझन’मध्ये पीयुष पाटील अव्वल
मराठा विद्या प्रसारक समाज संचलित नाशिक येथील होरायझन अकॅडमी या इंग्रजी माध्यमाच्या शाळेचा दहावीचा निकाल १०० टक्के लागला. पीयुष पाटील ९४.४० टक्के गुण मिळवून प्रथम, हार्दिक रायसोनी (९१.४०) व्दिकीय आले. विद्यालयातील ५५ विद्यार्थ्यांपैकी ३१ उत्कृष्ट श्रेणीत तर १९ विद्यार्थी प्रथम श्रेणीत आणि पाच जण द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण झाले.

अरूणा नाठेचे प्रतिकूल
परिस्थितीत यश
प्रतिकूल परिस्थिती असली तरी इच्छाशक्तीच्या जोरावर यश मिळविता येते हे नाशिक येथील उंटवाडी रस्त्यावरील निरीक्षण गृहातील अरुणा नाठे या मुलीने दहावीच्या परीक्षेत ७५ टक्के गुण मिळवून दाखवून दिले आहे. ही मुलगी रमाबाई आंबेडकर विद्यालयात शिकते. या यशाबद्दल चंदुलाल शाह यांनी तिचा सत्कार केला. यावेळी आधाराश्रमाच्या सचिव प्रा. निशा पाटील उपस्थित होत्या. इगतपुरी तालुक्यातील रायांबे गावातील या मुलीचे पितृछत्र हरपले असून आई शेतमजुरी करते. आपल्या मुलीने शिक्षण घेऊन मोठे व्हावे या ध्येयाने प्रेरित होऊन तिच्या आईने सातवीपासून अरूणाला निरीक्षणगृहात दाखल केले. इच्छाशक्तीने या मुलीने हुशारीची चुणूक दाखवित उत्कृष्ठ यश मिळविले.

‘रासबिहारी’ ची परंपरा कायम
नाशिक येथील रासबिहारी इंटरनॅशनल स्कुलचा दहावीचा निकाल दरवर्षीप्रमाणे १०० टक्के लागला. शाळेतील सात विद्यार्थी हे ९१ ते ९७ टक्के, ४३ टक्के विद्यार्थी ८१ ते ९० टक्के गुण आणि २५ टक्के विद्यार्थ्यांनी ७२ ते ८० टक्के गुण मिळविले. शाळेतील कौस्तुभ हरित ९६ टक्के, शुभम देशपांडे ९४ टक्के यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय व सिद्धी बेदमुथा ९२.४ टक्के, महिमा गायकवाड ९२.२ टक्के, ओनकार गायकवाड ९२ टक्के यांनी तृतीय क्रमांक पटकावला.