कोणे एकेकाळी जिल्ह्याच्या ग्रामीण भागात प्रवासासाठी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या (एसटी) बसशिवाय पर्याय नव्हता. परंतु वाढती खासगी वाहतूक आणि महामंडळाचे गलथान व्यवस्थापन, कर्मचाऱ्यांचा उध्दटपणा अशा एकत्रित कारणांमुळे अलीकडे एसटीची सेवा रडतखडत सुरू आहे. परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत असल्याची जाणीव झाल्याने एसटीच्या व्यवस्थापनाने आता हात-पाय हलविण्यास सुरूवात केली असली तरी खासगी प्रवासी वाहतुकीच्या विळख्यातून सुटका करून घेण्यासाठी त्यांना प्रवासी हिताचे निर्णय घेण्याची आवश्यकता आहे.
वैभवशाली युगाची साक्षीदार असलेली एसटी आज अनेक संकटांना तोंड देताना दिसत आहे. कधीकाळी ग्रामीण भागात कोणत्याही मार्गावर जाणारी बस हमखास प्रवाशांनी तुडूंब भरलेली राहात असे. काही मार्गावर तर दिवसातून दोन किंवा तीनच बस धावत. तरीही प्रवासी कित्येक तास बसची वाट पाहात थांब्यावर थांबून राहात. ग्रामीण भागात काही मोजक्या थांब्याचा अपवाद वगळता कुठेही पक्क्या स्वरूपात बांधकाम केलेले प्रवासी निवारागृह दिसत नसे. रस्त्यावरील गावाजवळील एखादे नीम, वड किंवा पिंपळाचे झाड म्हणजे बस थांबा, अशी स्थिती राहात असे. अर्थात अशी स्थिती आजही काही ठिकाणी पाहावयास मिळते.  ग्रामीण भागात प्रवासासाठी दुसरा पर्याय नसल्याने ग्रामस्थांना बसची वाट पाहण्याशिवाय गत्यंतरही नव्हते. त्याचा फायदा घेत चालक आणि वाहक प्रवाशांवर जवळपास दादागिरी गाजवून घेत

असत. पहिल्या एक-दोन थांब्यांवर बस प्रवाशांनी गच्च भरल्यावर पुढील
थांब्यांवर ती न थांबताच निघून जात असे. प्रवाशांचा प्रतिसाद अधिक परंतु बससेवा कमी अशी परिस्थिती काही वर्षांपूर्वी होती. त्यामुळे एसटीला आपल्या कार्यपध्दतीत काही बदल करण्याचीही गरज भासली नाही. कित्येक मोठय़ा शहरांमधील बस स्थानकांची पूर्णपणे वाताहत झालेली असतानाही त्यांची दुरूस्ती कधी करता आली नाही.हळूहळू ग्रामीण भागात टॅक्सी, व्हॅन, रिक्षा यांव्दारे खासगी प्रवासी वाहतुकीला सुरूवात झाली.
रस्त्यात कुठेही उतरण्याची सोय प्रवाशांना या खासगी वाहतुकीमुळे झाली. शिवाय बसपेक्षा कमी पैशांमध्ये खासगी वाहतूकदार नेत असल्यामुळे बसमधून जाणारी गर्दी खासगी वाहतुकीकडे वळू लागली. त्यामुळे आपोआपच बस रिकाम्या धावताना दिसू लागल्या. ग्रामीण भागात पुन्हा वैभवशाली दिवस येण्यासाठी एसटीने उपाययोजना करण्याची गरज असून खासगी वाहतुकीच्या धर्तीवर प्रत्येक मार्गावर मीनी बससेवा सुरू करणे आवश्यक झाले आहे. सटाणा-मालेगावसह काही मार्गावर अशी बससेवा सुरू करण्यात आली असून तिला चांगला प्रतिसाद मिळत आहे. शिवाय प्रवाशांना हव्या त्या ठिकाणी बस थांबविणे आता गरजेचे झाले आहे. या स्वरूपाचे उपाय योजल्यास खासगी वाहतुकीपेक्षा प्रवासी पुन्हा एकदा एसटीला प्राधान्य देऊ लागतील.