घाऊक प्रमाणात डिझेलची खरेदी करणाऱ्या राज्य परिवहन महामंडळासाठी डिझेल प्रति लीटर ११ ते १२ रुपयांनी महागले असल्याने त्याचा फटका एसटीच्या आर्थिक स्थितीला बसणार आहे. त्यामुळे ही वाढ रद्द करण्याच्या प्रमुख मागणीबरोबरच कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्याच्या मागणीसाठी एसटी कामगार संघटनेच्या वतीने सोमवारी निदर्शने करण्यात आली.
एसटीच्या विभागीय कार्यालयासमोर काळ्या फिती लावून कर्मचाऱ्यांनी निदर्शने केली. एसटी कामगार संघटनेचे विभागीय अध्यक्ष अशोक शिंदे, सचिव दिलीप परब तसेच राजू तेलोरे, रमाकांत होले, संजय बदे, सुरेश राऊत आदी प्रमुख त्या वेळी उपस्थित होते. केंद्र शासनाने १८ जानेवारीला डिझेलच्या दरातील वाढ जाहीर केली. ही दरवाढ करताना किरकोळ ग्राहकांसाठी ४० ते ५० पैसे, तर घाऊक प्रमाणात डिझेल घेणाऱ्या एसटीसाठी ही वाढ ११ ते १२ रुपयांनी झाली आहे. त्यामुळे महामंडळावर ५०० कोटी रुपयांचा भार पडणार आहे. त्यामुळे एसटीच्या आर्थिक स्थितीवर विपरीत परिणाम होणार आहे. हा निर्णय रद्द करण्यात यावा, अशी संघटनेची मागणी आहे.
डिझेलवरील व्हॅट रद्द करावा, राज्य शासनाने प्रवासी कर १७.५ टक्क्य़ांवरून पाच टक्क्य़ांपर्यंत आणावा. वाढीव महागाई भत्ता द्यावा, कनिष्ठ वेतनश्रेणी रद्द करावी आदी मागण्याही संघटनेने मांडल्या आहेत. देशभरातील सर्व राज्य परिवहन मंडळातील केंद्रीय संघटनेशी सलग्न असणाऱ्या संघटनांची संयुक्त बैठक ३० जानेवारीला होणार आहे. या बैठकीत डिझेलबाबतच्या मागणीविषयी आंदोलनाचे पुढील धोरण ठरविण्यात येणार आहे.