News Flash

एसटी प्रवाशांना आधुनिक तंत्रज्ञानाचा नाहक मनस्ताप

तंत्रज्ञानामुळे काम सोपे झाले हे खरे, मात्र, यामुळे माणूस काहिसा आळशी बनला.

| March 14, 2015 06:54 am

तंत्रज्ञानामुळे काम सोपे झाले हे खरे, मात्र, यामुळे माणूस काहिसा आळशी बनला. काही वर्षांपूर्वी बहुतेकांकडे दूरध्वनी क्रमांक टिपण्यासाठी एखादी वही असायची. त्यावर आपल्या आप्तमित्रांचे क्रमांक लिहिले जायचे. अनेक जण कित्येक क्रमांक स्मरणात ठेवायचे. तथापि, भ्रमणध्वनीमध्ये हे क्रमांक जतन करण्याची सुविधा उपलब्ध झाल्यावर वही ठेवण्याची गरज वाटेनाशी झाली. भ्रमणध्वनीत अचानक काही दोष उद्भवल्यानंतर हे क्रमांक गमाविण्याची नामुष्की एखाद्यावर ओढावत असते. प्रवासी संख्या वाढविण्यासाठी प्रयत्नशील असणाऱ्या एसटी महामंडळाने कार्यात गतिमानता आणण्यासाठी स्वीकारलेले आधुनिक तंत्रज्ञान इतके अंगवळणी पडले की, अपवादात्मक स्थितीत कधी जुन्या तंत्रज्ञानाची हाताळणी करावयाची झाल्यास थेट नकार दिला जातो. आणि त्याचा नाहक जाच प्रवाशांना सोसावा लागतो. लासलगाव आगारात सव्‍‌र्हेर नादुरुस्त झाल्यामुळे शुक्रवारी वाहकांना संगणकीकृत यंत्रणेवरील तिकीटांऐवजी जुनी तिकीटे देण्यास आगार व्यवस्थापकांनी नकार दिला. परिणामी, बस आणि वाहक उपलब्ध असुनही बसेस धावल्या नाहीत. या कारणास्तव लासलगाव आगारातुन सुटणाऱ्या दैनंदिन बसेस बंद राहिल्याने प्रवाशांना नाहक मनस्ताप सहन करावा लागला. परीक्षेला निघालेल्या विद्यार्थ्यांना या कार्यशैलीचा फटका बसला. काळानुरुप बदलत एसटी महामंडळाने आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने कामात गतिमानता आणली. मात्र त्यासाठी वापरलेले तंत्रज्ञान महामंडळाच्या कामकाजाला ‘ब्रेक’ लावणारे ठरले. लासलगाव स्थानकावर यंत्रांवर तिकीट प्रोग्रॅम भरण्याचे काम तीन संगणकावर केले जाते. शुक्रवारी सकाळी सव्‍‌र्हर यंत्रणा नादुरुस्त झाल्यामुळे हे काम होऊ शकले नाही. वाहकांना जुन्या पध्दतीची तिकीटे देऊन बसेस रवाना करता आल्या असत्या. परंतु, जुन्या पध्दतीची तिकीटे देण्यास आगार व्यवस्थापिका मनिषा सपकाळे यांनी नकार दिला. नव्याने भरती झालेल्या वाहकांना केवळ संगणकीय यंत्राचे तिकीट दिले जाते. त्यांना जुन्या हाताने द्यावयाच्या तिकीटाचे टप्पा व त्यावरून तिकीट देण्याचे प्रशिक्षण नसल्याने या वाहकांना ती देता येणार नाही असा पवित्रा घेतला. यामुळे पुण्याला जाणाऱ्या गाडीसह अनेक बस आगारातून बाहेर पडल्या नाही. यामुळे बाहेरगावी निघालेले प्रवासी, परीक्षाला जाणारे विद्यार्थी या सर्वाना नाहक मनस्ताप सहन करावा लागला. काही प्रवाशांनी आगार व्यवस्थापिकांशी संपर्क साधला असता नाशिक येथे बैठकीला जायचे असल्याचे सांगून त्या निघून गेल्या. यामुळे प्रवाशांच्या संतापात भर पडली. दरम्यान, या संदर्भात नाशिक विभागीय नियंत्रक यामिनी जोशी यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी नवोदीत वाहकांना दोन्ही तिकीट वितरणाचे प्रशिक्षण दिले जात असल्याचे सांगितले. असे असताना मग जुन्या पध्दतीची पारंपरीक तिकीट का दिली गेली नाही असा प्रश्न निर्माण झाला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 14, 2015 6:54 am

Web Title: st passengers suffering by modern technology
टॅग : Nashik,St
Next Stories
1 पेपर फुटीच्या निषेधार्थ मनसेचे आंदोलन
2 कुसुमाग्रज प्रतिष्ठानचा उद्यापासून‘रंगालय’ उपक्रम
3 मांजरपाडा प्रकल्पास लवकरच सुधारित प्रशासकीय मान्यता
Just Now!
X