‘बहुजन हिताय् बहुजन सुखाय’ हे ब्रीद घेऊन प्रवाशांची जीवनवाहिनी झालेल्या एस. टी. महामंडळाच्या जाहिरातींसाठी सरकारचे विविध विभाग व खासगी संस्थाही दार ठोठावत. मात्र, काळानुरूप एस. टी.च्या सेवेत अपेक्षित बदल न झाल्याने पंचतारांकित सुविधा देणाऱ्या खासगी वाहतूक कंपन्यांनी प्रवाशांना आकर्षति केल्याने एस. टी.चा प्रवास तोटय़ाकडे सुरू झाला. त्यामुळे इतर संस्थांच्या जाहिराती करणारी एस. टी. बस आता आपल्याच प्रवासी योजनांची जाहिरात करण्यास सरसावली असून चित्ररथाच्या माध्यमातून गावागावांत प्रवाशांपर्यंत जाणार आहे.
एस. टी. महामंडळाचे जिल्ह्य़ात अडीच हजार कर्मचारी असून, ५०० बसेस प्रवाशांच्या सेवेसाठी तनात आहेत. आजही ग्रामीण भागात एस. टी. हेच प्रवासाचे मुख्य साधन आहे. एस. टी. प्रवास सुरक्षित मानला जातो. मात्र, खासगी वाहनांच्या विळख्यात एस. टी. महामंडळाला प्रवासी टिकवून ठेवण्यासाठी पराकाष्टा करावी लागत आहे. महामंडळातील भ्रष्ट कारभार व खासगी प्रवासी वाहतूक कंपन्यांच्या गाडयांची वाढती संख्या, यामुळे एस. टी.पुढे अस्तित्वाचाच प्रश्ननिर्माण झाला आहे. एस. टी.चा प्रसार व प्रचार व्हावा, प्रवाशांसाठीच्या योजना त्यांच्यापर्यंत पोहोचवाव्यात या साठी महामंडळाकडून प्रयत्न सुरू झाले आहेत. यापूर्वी एस. टी. महामंडळाच्या बसेसवरुन सरकारच्या विविध विभाग व खासगी संस्थांची जाहिरात केली जात असे.
स्पध्रेच्या युगात स्वतचे अस्तित्व टिकवून प्रवाशांना आकर्षति करण्यासाठी एस. टी.च्या योजनांचा प्रसार आता चित्ररथाच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. राज्यात एस. टी. महामंडळाच्या बसेस हेच सर्वसामान्यांचे वाहन होते. कालांतराने खासगी वाहनांनी पंचतारांकित अशा सुविधा देणाऱ्या ट्रॅव्हर्ल्समुळे महामंडळाकडे असलेला प्रवाशांचा ओढा कमी होऊ लागला आहे. अशा स्थितीत प्रवाशांना आकर्षति करण्यासाठी आवडेल तेथे प्रवास, मासिक पास, त्रमासिक पास, प्रासंगिक करार अशा विविध योजनांची माहिती ग्रामस्तरापर्यंत नेण्याच्या उद्देशाने प्रशिक्षण बसला चित्ररथाचा आकार देण्यात येत आहे. या बसेसवर मोठे बॅनर, स्टिकर लावून योजनांची माहिती प्रवाशांपर्यंत पोहोचविण्यात येणार आहे. हे चित्ररथ प्रजासत्ताकदिनी होणाऱ्या परेडमध्ये सहभागी होणार आहे. त्या दृष्टीने बीड विभागाची तयारी सुरु आहे.