गोंदिया आगारातील राज्य परिवहन कामगार कामगार संघटनेने राज्य परिवहन महामंडळासोबत काही वाटाघाटी केल्या. या वाटाघाटी परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांच्या हिताच्या नाहीत, असा आरोप करीत महाराष्ट्र राज्य नवनिर्माण राज्य परिवहन कामगार सेनेने गोंदिया बसस्थानकाच्या प्रवेशद्वारावर दुपारी एस.टी. कामगार सेनेचे केंद्रीय सचिव हनुमंत ताटे यांचा पुतळा जाळून निषेध व्यक्त केला. एस.टी. कामगार संघटनेने परिवहन महामंडळाशी केलेल्या वाटाघाटीनुसार १३ टक्के वाढीव भत्त्याचा करार केला आहे. आधीच अत्यंत कमी पगार असलेल्या राज्य परिवहन मंडळाच्या कर्मचाऱ्यांवर अन्याय झाला आहे. त्यामुळे मनसे परिवहन कामगार सेनेच्या सर्व पदाधिकारी, सदस्य व राज्य परिवहन मंडळाच्या कर्मचाऱ्यांनी निषेध व्यक्त केला व या संघटनेची मान्यता रद्द करा, अशी नारेबाजी केली, तसेच १३ टक्के वाढीव भत्याचा निषेध नोंदविला.
महाराष्ट्र नवनिर्माण राज्य परिवहन कामगार सेनेने परिवहन महामंडळाकडे ४० टक्के ग्रेड पे ची मागणी केली आहे, तसेच या कामगार सेनेला मान्यता देण्यात यावी, अशा घोषणाही यावेळी करण्यात आल्या.
यावेळी आगार सचिव धनंजय पशिने, मनसे कामगार सेनेचे गोंदियाचे अध्यक्ष विनय तिवारी, कार्याध्यक्ष प्रकाश रामटेके, नारायण ढवरे, ननसिंग कुसराम, गोपी बर्वे, संजय मंगताळे, सुदर्शन जाधव, भगवानदास नाटेश्वरी, एन.सी. पटले, आर.आर.सोनवाने, एल.एल. हरिणखेडे, पी.बी.चव्हाण, डी.डी.टेपाले, एस.टी. सलामे, नूतन बानेवार, एस.जी. क्षीरसागर व इतर राज्य परिवहन मंडळाचे कर्मचारी उपस्थित होते. याचा निषेध मनसेचे जिल्हाध्यक्ष रितेश गर्ग व जिल्हा कार्यकारिणीच्या मार्गदर्शनात नोंदविण्यात आला.